कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून हज यात्रेसाठी जाणार्‍या ३१९ भाविकांना लसीकरण करण्यात आले आहे. तसेच भाविकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सुविधा अ‍ॅपची निर्मिती केली आहे, अशी माहिती राज्य हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांनी येथे मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुस्लिम धर्मियामध्ये हज यात्रेला विशेष महत्त्व आहे. ही यात्रा पवित्र असल्याची भाविकांमध्ये धारणा आहे. तथापि हजमध्ये गेल्यानंतर भाविकांना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी हज कमिटीचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत नेमकी कोणती कार्यवाही सुरू आहे याची माहिती देण्यासाठी हज कमिटीचे कोल्हापुरी पदाधिकारी आज कोल्हापूर येथे आले होते.

हेही वाचा – कोल्हापूर : विधवा-विधुरांच्या पाद्यपुजनाने गृहप्रवेश; सोनाळीतील सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचे पुरोगामी पाऊल

कोल्हापूर जिल्ह्यातून यावर्षी ३१९ मुस्लिम भाविक हजयात्रेला जाणार आहेत. या यात्रेकरूंना हज प्रवासादरम्यान आणि यात्राकाळात करावयाच्या विधीबाबत मार्गदर्शन करण्यात येते. लिम्रास फौंडेशन आणि हज फौंडेशन यांच्यावतीने आज या भाविकांना सीपीआरमध्ये लसीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा कार्यक्रम झाला.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या पथकाने लसीकरण केले. त्यानंतर मुस्लिम बोर्डींगमध्ये हज यात्रेकरूंना मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान राज्य हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांनी या शिबिराला भेट देवून भाविकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील २७ हजार भाविकांनी हजयात्रेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे २० हजार यात्रेकरूंची निवड कमिटीमार्फत झाली आहे. हे यात्रेकरू दोन ते सहा जून या कालावधीत मुंबईवरून हजयात्रेसाठी रवाना होतील. त्यासाठी लिम्रास फौंडेशन आणि हज फौंडेशनतर्फे मुंबईपर्यंत वाहनांची मोफत सोय दरवर्षी करण्यात येते. यावर्षी यात्रेकरूंसोबत कोल्हापुरातील दोन सेवेकरींची निवड करण्यात आली आहे, असे इम्तियाज काझी यांनी सांगितले.

हेही वाचा – पालकमंत्री कोल्हापूरवासीयांना फसवत आहात; मुश्रीफ यांनी माफी मागावी, शिवसेनेची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हज यात्रेच्या काळात सौदी अरेबियामध्ये असलेल्या भाविकांना कोणतीही समस्या येवू नये, यासाठी हज कमिटी ऑफ इंडियाने सुविधा अ‍ॅप हे नवं अ‍ॅप सुरू केले. या अ‍ॅपचा वापर करून यात्रेकरू आपल्या समस्यांचं निराकरण करू शकतील, असेही काझी यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला हज कमिटीचे जुबेर अहमद, हाजी इकबाल देसाई, समीर मुजावर, इम्तियाज बारगीर, रियाज बागवान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.