कोल्हापूर : संत बाळूमामा देवस्थानात प्रशासक नेमल्यावरही भाविकांच्या असुविधांमध्ये वाढच झाली आहे. देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची त्वरित ‘सी.आय.डी.’ चौकशी व्हावी, तसेच संभाव्य सरकारीकरण रहित करून मंदिर भक्तांच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ मोर्चाद्वारे करण्यात आली.

‘बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था’, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी निवेदन स्वीकारले.मोर्चात पिवळा भंडारा लावून, तसेच घंटा आणि ढोल वाजवत भक्तगण सहभागी झाले होते. ‘ सुनील सामंत हे संत बाळूमामा यांची वेशभूषा करून सहभागी झाले होते. बाळूमामा देवस्थानचे सरकारीकरण, नाही होऊ देणार’, बाळूमामांच्या मंदिराचे सरकारीकरण का?’, ‘बाळूमामांच्या भक्तांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे’आदी घोषणांनी दसरा चौक दणाणून गेला.

हेही वाचा >>>कोल्हापुरात विकसित केलेल्या ऊस तोडणी यंत्राचे शाहू कारखाना प्लॉटवर प्रात्यक्षिक

बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्थे’चे अध्यक्ष निखिल मोहिते-कुराडे,ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट बाबासाहेब भोपळे, गजानन तोडकर, किरण कुलकर्णी, रामभाऊ मेथे, सुनील सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.