कोल्हापूर : सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास आदी विविध कारणांनी कोल्हापूरला भेट दिलेले डॉ. मनमोहन सिंग हे त्यांच्या विनम्र स्वभावामुळे स्मरणात राहिले. कोल्हापूर जिल्ह्याने सहकारात केलेल्या कार्याने ते प्रभावित झाले होते.

१९९३ साली ‘फाय फाउंडेशन’ पुरस्कार कार्यक्रमाला डॉ. सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते जब्बार पटेल आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. फाय उद्योग समूह आणि त्यांच्या प्रतिष्ठा लाभलेल्या पुरस्काराचे डॉ. सिंग यांनी कौतुक केले होते, असे नियोजन समितीतील डॉ. श्रीवल्लभ मर्दा यांनी सांगितले.

हेही वाचा >>>कोल्हापुरात नाताळ सण उत्साहात

सहकाराचा गौरव

त्यानंतर केंद्रीय वित्त मंत्री डॉ. सिंग यांनी इचलकरंजीतील विणकर समाजाने बांधलेल्या श्री चौंडेश्वरी सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन केले. त्यावेळी ही इमारत गावातील अन्य बँकांच्या मानाने टुमदार, प्रशस्त, आधुनिक स्थापत्य शैलीची अशी होती. त्याचे डॉ. सिंग यांनी कौतुक करून सहकाराच्या माध्यमातून परिसरात वस्त्रोद्योग वाढीस लागल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता, अशी आठवण बँकेचे तत्कालीन अध्यक्ष विठ्ठलराव डाके यांनी कथन केली.

विद्यार्थ्यांना कवाडे खुली

पुढील वर्षी डॉ. मनमोहन सिंग यांनी शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती लावली होती. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान केला होता. समारंभात डॉ. सिंग यांनी जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण या धोरणामुळे भारताची आर्थिक प्रगती झाली आहे. यामुळे देशभर व्यापक संधीची कवाडे उपलब्ध झाली असून त्याचा नवपदवीधरांनी लाभ घेण्याचे आवाहन केले होते.

हेही वाचा >>>कोल्हापुरातील दुसरा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, १२१६ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंध ग्रामविकासाशी

२०१० साली राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची पंतप्रधान कार्यालय खात्याचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून भेट घेतली होती. तेव्हा ग्रामीण भागातील अर्थकारण वाढीस लागण्यासाठी आपण मांडलेल्या संकल्पनांना सहकार्य करण्याची भूमिका घेत पुढे या विभागाला चांगले अर्थसहाय्य केले, असे सतेज पाटील यांनी नमूद केले. डॉ. सिंग यांच्या निधनानंतर त्यांच्या कोल्हापूर भेटीविषयी आठवणींना असा उजाळा मिळत राहिला.