कोल्हापूर : अमित शहा यांची सासरवाडी म्हणून वा कोणाचा नातेवाईक कोठे राहतो म्हणून आपत्तीवेळी बाधितांना शासनाची मदत मिळत नसते. तर ती निकषांनुसार मिळत असते, असे विधान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर आहे. केंद्राकडून चांगली मदत आली, तर ती बाधित शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक देता येणे शक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या, की पूरग्रस्तांना मदत करावी या सद्भावनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांनी मदत केली आहे. त्यावर छायाचित्र असल्याने ही मदत कोणाकडून आली आहे हे समजू शकते. मदत साहित्यात कीड, अळी कदाचित आढळली, तर ती कोणाकडून आली हे समजू शकते. अशा मदतीवरून राजकारण करणे चुकीचे आहे. या माध्यमातून विरोधकांकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

कुवतीची भाषा जनावरांसाठी

वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यात माझ्या कुवतीचा कोणी नेता नाही असे विधान केले आहे. यावर बोलताना गोऱ्हे यांनी ही भाषा पात्रता जनावरांसाठी वापरली जाते. आपण माणसांचा विचार केला पाहिजे, असा टोला लगावला. शिवाय लगेचच, नाईक यांच्या विधानाबाबत गैरसमज करू नये. याबाबत मी त्यांच्याशी बोलेन. पण ते चर्चेला भेटतील का, यावरही त्यांनी स्वतःच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महायुती शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी

शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ आर्थिक मदतीपुरत्याच मर्यादित नसून, त्यांच्या जीवनमानाशी आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेशी निगडित असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘शेती हा महाराष्ट्राचा कणा आहे. शेतकऱ्यांचे संकट कमी करणे म्हणजे समाजाच्या प्रगतीला गती देणे होय.’ महायुती शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार मदतीसाठी संवेदनशील भूमिका घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दर्शनानंतर डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधावा, सामाजिक प्रश्नांवर तत्परतेने उभे राहावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. या बैठकीस कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते. त्यांच्यासह शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, सातारा-कोल्हापूर संपर्कप्रमुख शारदा जाधव, सांगली संपर्कप्रमुख सुनीता मोरे, कोल्हापूर जिल्हाप्रमुख शुभांगी पवार, इचलकरंजी जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे, शहरप्रमुख अमरजा पाटील, उत्तर कोल्हापूर शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, युवती शहरप्रमुख नम्रता भोसले, जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण व विजय बलगुडे उपस्थित होते.

महालक्ष्मी देवीचे दर्शन

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कोल्हापूर येथील करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन शेतकऱ्यांच्या संकट निवारणासाठी प्रार्थना केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान लवकर भरून निघावे व कुटुंबांना दिलासा मिळावा, अशी मनोकामना त्यांनी देवीसमोर व्यक्त केली.