दयानंद लिपारे

कोल्हापूर : अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळय़ाने राज्यातील मंदीत अडकलेल्या वस्त्रोद्योगाला मोठा आधार मिळाला आहे. या सोहळय़ासाठी विविध प्रकारचे कपडे, वस्त्रप्रावरणे, झेंडे, फलक अशा उत्पादनातून केवळ महाराष्ट्रात १०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे.अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा देशभर वाजतगाजत साजरा झाला. या निमित्ताने दुसरी दिवाळी झाल्याचा अनुभव गावागावांमध्ये आला. याकरिता विविध प्रकारच्या वस्तूंची उलाढाल मोठय़ा प्रमाणात वाढली. वस्त्रोद्योग बाजारपेठेत या घटनेमुळे चैतन्य आले.

महाराष्ट्रातील इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव ही केंद्रे ‘ग्रे -पॉपलीन’ प्रकारच्या कापड निर्मितीत अग्रेसर आहेत. अशा कापडावर राजस्थानातील पाली – बालोत्रा येथे रंगभरण प्रक्रिया (प्रोसेसिंग) झाल्यानंतर ते देशभरात विक्रीसाठी पाठवले जाते. अशा प्रकारच्या कपडय़ांपासून सलवार-कुर्ता, तर निटिंग उद्योगात टी-शर्ट बनवले जातात. राज्यातील वस्त्रोद्योगाकडे अयोध्येतील सोहळय़ासाठी या प्रकारचे केशरी रंगातील कुर्ते, टी शर्टची लाखोंच्या संख्येने मागणी नोंदवण्यात आली होती. बाजारपेठेत गेल्या दोन आठवडय़ांत असे केशरी रंगातील कुर्ते, टी शर्ट मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी आले होते. उत्सवप्रेमी ग्राहकांनी दराची खळखळ न करता चांगली किंमत मोजून त्यांची खरेदी केली. याशिवाय श्रीरामाचा नामोल्लेख असलेल्या केशरी रंगाच्या साडय़ाही हातोहात विकल्या गेल्या. भगवी टोपी, साधूंची भगवी वस्त्रे यांनाही मोठी मागणी राहिली. करोनापासून राज्यातील वस्त्रोद्योग आर्थिक गर्तेत सापडला असताना या एका सोहळय़ाने मोठी उलाढाल झाली. ही उलाढाल १०० कोटींहून अधिक रुपयांची असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा >>>सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर पर्यटक, भाविकांनी फुलले

अयोध्येतील या सोहळय़ाचा एक भाग बनताना लोकांनी भगव्या रंगाचे सलवार कुर्ते आणि श्रीराम असा उल्लेख असलेले पांढरे शर्ट आवडीने खरेदी केले. त्यामुळे गेल्या आठवडय़ात या कपडय़ांची मागणी झपाटय़ाने वाढली होती. केवळ आमच्या फर्ममधून सरासरी ३५० रुपये किमतीचे १५ हजार सलवार-कुर्ते विकले गेले. –अक्षय शिंदे, गार्मेट व्यावसायिक

या सोहळय़ाच्या निमित्ताने महिलांमध्ये विशेष उत्साह होता. ‘श्रीराम’ असे लिहिलेल्या केशरी रंगाच्या साडय़ा एरवी प्रत्येकी ५०० रुपयाला विकल्या जातात. या सोहळय़ानिमित्त आम्ही ‘ना नफा ना तोटा’ हे सूत्र ठेवून ३५० रुपये दराने हजारो साडय़ा विकल्या. उत्साही प्रतिसादामुळे अखेर साडय़ा अपुऱ्या पडल्याने ग्राहकांची नाराजी स्वीकारावी लागली. –अमित पटवा, रामदेव साडी, इचलकरंजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेले काही दिवस वस्त्र उद्योगामध्ये मंदीचे वातावरण होते. मागणीअभावी उलाढाल ठप्प होती. अयोध्येतील राम मंदिर सोहळय़ामुळे अचानक नानाविध प्रकारच्या कापड – कपडय़ांना मागणी वाढली. राज्यात केवळ ग्रे कापडाची (कच्चे कापड) ५० कोटींची तर एकूण अंदाजे १०० कोटींची उलाढाल झाली आहे. देशभरातील उलाढालीचा आकडा कोटय़वधींच्या घरात जाणारा आहे. –अशोक स्वामी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ