कोल्हापूर येथे बनावट नोटा व त्यासाठी लागणाऱ्या मशिनरी जप्त करण्यात आले आहेत. चार संशयित आरोपींकडून ५२ हजार ५८८ नोटांसह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कागल तालुक्यातील बाचणी येथे केली. लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सूरु असताना तापलेल्या राजकीय गरमागरम वातावरणात बनावट नोटा बाहेर आल्याने कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.

बाळु सुलेमान नायकवडी (वय ५६, कागल), विक्रम कृष्णात माने (वय ३२, भुदरगड), प्रवीण नारायण गडकर (वय ३६, रा. भुदरगड), गुरूनाथ दादू पाटील (वय २५, भुदरगड) ही अटक केलेल्या आरोपींची नांवे आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषणचे हवालदार अमोल आकाराम कोळेकर यांनी याबाबत कागल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आरोपी नायकवडी, गडकर, माने यांनी संगनमताने बनावट नोटा तयार करण्याची योजना आखली. गुरूनाथ पाटील यांस नोटा तयार करण्यासाठी लागणारी मशिनरी पुरविली. गुरूनाथने आपल्या घरातच कलर प्रिंटर कम स्कँनरव्दारे छापखाना सुरू केला. भारतीय चलनातील रुपये २ हजार, ५००, २०० च्या रुपये ५२ हजार ५८८ नोटा तयार करून बाजारात आणल्या. त्याची किंमत सुमारे २० लाख ३ हजार ५०० इतकी होते.

बुधवारी दुपारी आरोपींनी बाचणी येथील बसस्थानक परिसरात बनावट वापरण्यास सुरूवात केली. नोटांबाबत कांहीना संशय आला. ही बातमी कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागास मिळाली. त्यांनी सापळा रचून चार आरोपीना रंगेहाथ् पकडले. त्याना पेालिसी खाक्या दाखविताच बनावट नोटांचे बंडल, पोलिसांसमोर टाकले. मशिनरीही दाखविली.