कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायीनी असणारी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी, प्रदूषणमुक्तीसाठी निधीची तरतूद आणि प्रदूषणास जबाबदार घटकांवर कारवाई करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची ग्वाही मंगळवारी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी एका बैठकीवेळी दिली.
पंचगंगा नदी प्रदूषणाच्या अनुषंगाने मंत्री पंकजा मुंडे यांच्या दालनात बैठक पार पडली, यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार राहुल आवाडे यांनी पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने ही बैठक झाली. या बैठकीस राजेंद्र पाटील-यड्रावकर, राहुल आवाडे, अमल महाडीक हे आमदार, जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी तिन्ही आमदारांनी पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न सातत्याने गंभीर बनल्याने वस्त्रनगरीसह नदीकाठावरील गावांना या प्रदूषणाचा फटका बसत आहे. हे सर्व रोखण्यासाठी पंचगंगा नदी तातडीने प्रदूषणमुक्त होण्यासाठी उपाययोजनांची ठोसपणे अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याची मागणी केली. त्यावर मंत्री मुंडे यांनी सकारत्मकता दर्शवत प्रदूषणमुक्तीसाठी ठोस उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.