कागल येथील शाहू सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्प उभारणीचे काम येत्या पाच महिन्यात पूर्ण होऊन डिसेंबर २०१६ पासून प्रत्यक्षात इथेनॉल होणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष श्रीमंत समरजितसिंह घाटगे व त्यांच्या पत्नी श्रीमंत नवोदितादेवी घाटगे यांच्या हस्ते प्रकल्प भूमिपूजन झाले. कारखाना कार्यस्थळावर झालेल्या या छोटेखानी समारंभास श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाहू कारखान्याने योग्य वेळी योग्य ते आधुनिक बदल स्वीकारले आहेत. याच अनुषंगाने कारखान्याने आता प्रतिदिनी तीस हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्प उभारणीचे काम प्राज इंडस्ट्रीज लि. पुणे यांना दिले असून हा प्रकल्प मॉनिक्युलर टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. त्यामुळे कमी उत्पादन खर्चात इथेनॉलची निर्मिती होणार आहे.

देशात इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रण करून वापरल्यास त्यांचा इंधन म्हणून चांगला उपयोग होत असल्याचा विचार करून केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये प्रथम ५ टक्के इथेनॉलचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सध्या १० टक्के इथेनॉलचा वापर होत आहे. त्यानुसार संपूर्ण देशात २६६ कोटी व महाराष्ट्रात ३९ कोटी लिटर इथेनॉलची मागणी आहे. याचा विचार करून कारखान्याने हा प्रकल्प हाती घेतला आहे. सध्या महाराष्ट्रात सहकारी तत्त्वावर २७ व खासगी २३ इथेनॉल प्रकल्प कार्यरत आहेत. समारंभास कारखान्याचे उपाध्यक्ष एस.के मगदूम, ज्येष्ठ संचालक माजी आमदार वीरकुमार पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक विजय औताडे, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.