लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कागल तालुक्यातील महायुतीतील तीन गट एकत्र येऊन मताधिक्य मिळवत राहिले तर कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव साक्षात परमेश्वर आला तरी होऊ शकत नाही, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

सेनापती कापसी (ता. कागल) येथे हुतात्मा चौकात झालेल्या प्रचार सभेत मुश्रीफ बोलत होते. ते पुढे म्हणाले, कागल तालुक्यामध्ये अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा गट संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी एकत्र आला आहे. तिन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की कोणी कोणाच्या बोलण्यातून कृतीतून दुसऱ्या गटाचे कार्यकर्ते नाराज होतील आणि त्याचा परिणाम मंडलिक यांच्या मताधिक्यावर होईल अशी कृती आणि वक्तव्यही करू नये. आम्ही आता तुम्हाला मदत करणार आहोत तुम्ही विधानसभेला आमचे काय करणार अशा विषयाच्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत.

आणखी वाचा-लोकवर्गणीतून लोकसभा निवडणूक लढवून जिंकणार; राजू शेट्टी यांचा विश्वास

संजय मंडलिक म्हणाले, सदाशिवराव मंडलिक व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजकीय व सार्वजनिक जीवनात चिकोत्रा खोरातील जनता नेहमीच पाठीशी राहिली आहे. ही परंपरा यावेळीही अबाधित राहील. यावेळी शशिकांत खोत, सूर्याजी घोरपडे, अलका साळवी, मारुती चोथे आदींची भाषणे झाली.