कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही. तो कोणावरही लादला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिली असल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ तसेच पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केले. तर, या दोन्ही मंत्र्यांच्या भूमिकेवर माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी टीका केली आहे.
मुश्रीफ म्हणाले, की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शक्तिपीठ रस्त्याला मान्यता देणे, रस्त्याच्या खर्चासाठी १२ हजार कोटी निधी उभारणीला मान्यता देणे आणि त्यासाठी कर्ज उभारणे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील भूमी संपादनाची रद्द केलेली कारवाई पुनर्स्थापित करणे असे तीन विषय होते. पहिले दोन विषय मंजूर झाले. तिसऱ्या विषयाबद्दल मी आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीआधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील जमीन संपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आली.
आता मुख्यमंत्री फडणवीस हे शक्तिपीठ हा त्यांच्या स्वप्नातील प्रकल्प साकारण्यासाठी आग्रही आहेत. कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या एका गटाने जमिनीसाठी चांगला मोबदला मिळणार असेल तर जमिनी देण्यासाठी तयार असल्याचे त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगितले आहे. शक्तिपीठ हा रस्ता आम्ही करणारच. पण तो कोणावरही लादणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
सतेज पाटलांचा हल्लाबोल
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी गुरुवारी शक्तिपीठ महामार्गावरून राज्य शासनावर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मंत्रिमंडळातील भूमिकेबाबत साशंकता व्यक्त केली. शक्तिपीठ प्रकल्पाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी विरोध दर्शवला की नाराजी दर्शवली याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट होणे गरजेचे आहे. महायुतीमध्ये दोन्ही पक्षांची हतबलता दिसते, असा टोला त्यांनी लगावला. महायुतीचे शासन म्हणजे नैसर्गिक आघाडीचे नसून ते जबरदस्तीने एकत्रित आलेल्या आघाडीचे असल्याची टीकाही पाटील यांनी केली.