मुसळधार पावसाने जिल्ह्यतील नद्यांना आलेल्या पुरामुळे पूरबाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठय़ा संकटाचा सामना करावा लागत आहे. आíथक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. पंचगंगेला आलेल्या पुरामुळे नदीकाठी तरारून आलेली पिके हातून गमावण्याची धोका निर्माण झाला असून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यात पुराने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत .
मागील आठवड्यात जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. ५ दिवसांच्या जोरदार पावसाने कोरडय़ा पडलेल्या नद्यांना पूर आला, तर तळाला गेलेला धरणांचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला. पंचगंगेसह तमाम नद्यांना पूर आला आहे. पावसाचे पाणी बागायती पिकांमध्ये शिरले आहे. नदीकाठच्या सर्व २७२ गावांतील शेतकऱ्यांची ही कैफियत असून, ते नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये एकीकडे पुराचे पाणी शेतात गेल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने सर्व संसार उघडय़ावर आले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या मदतीने या पथकांनी घरांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, असेही त्यांनी सुचवले. पूरस्थितीने झालेल्या नुकसानीचे शासनाच्या मार्गदर्शनानुसार पंचनामे केले जातील. यानंतर जिल्ह्याचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाईल. या नुकसानीबाबत भरपाईचा निर्णय राज्य शासन घेईल, अशी माहिती डॉ. सनी यांनी दिली आहे.
पुरामुळे आतापर्यंत तब्बल १ कोटी १९ लाखांचे नुकसान झाल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. एकंदरीत पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच जिल्ह्यातील नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता सर्वाचे लक्ष पंचनामे पूर्ण कधी होतात याकडे लागले असून, पूरग्रस्तांना सरकार कशी आणि नेमकी किती मदत करते, यालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच, साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी प्रशासनाने सतर्कता बाळगून प्राथमिक उपाययोजना पूर्ण कराव्यात अशाही सूचना त्यांनी या वेळी केल्या.
जिल्ह्यात पुराने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी प्रांताधिकारी, तहसीलदारांना दिलेत.
हा पंचनामा करताना कृषी सहायक, प्रांताधिकारी आणि तहसीलदार असे तीन जणाचे पथक जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केले आहे. पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच जिल्ह्यातील नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होईल, असे डॉ. सनी यांनी या वेळी सांगितले.