कोल्हापूर: कोल्हापुरात गेले आठवडाभर सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. धोकादायक इमारतीवर तसेच ओढे -नाल्यावरील अतिक्रमणाबाबत नोटीस न देता कारवाई करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी सोमवारी संबंधितांना दिल्या.
जिल्ह्यात उद्या मंगळवारी धोकादायक (रेड अलर्ट) अंदाज हवामान खात्याने दिला असल्याने मान्सून आणि संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचनेनुसार ही बैठक घेण्यात आली.
सर्व उप-शहर अभियंता यांनी आजच सर्व निवारा केंद्राची पाहणी करण्याच्या, पूर आल्यावर पर्यायी निवारा केंद्राची व्यवस्था करण्यासाठी पर्याय म्हणून मंगल कार्यालयाची यादी तयार करण्याच्या सूचना रोकडे यांनी दिल्या.
शहरातील धोकादायक इमारतींना नोटिसा देऊन त्या उतरविण्याची पुढील कारवाई करावी. पूरपरिस्थीतीत शहराला पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने शिंगणापूर योजना १० जूनपर्यंत कार्यान्वित करावी तसेच पूरबाधित क्षेत्रातील रुग्णालयांना स्थलांतरीत होण्यासाठी नोटीस लागू करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.