रुई (ता. हातकणंगले) परिसरातील के टेक्स या टेक्स्टाईल कंपनीच्या कापड गोदामाला शॉर्टसíकटने आग लागली. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत सुमारे सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
आभार फाटा ते चंदूर मार्गावर रुई गावच्या हद्दीत अनिल गोयल यांच्या मालकीचा के टेक्स या नावाने यंत्रमाग कारखाना आहे. या कारखान्याच्या वरील मजल्यावर कापडाचे गोदाम आहे. या गोदामात महागडे शर्टीगचे तयार तागे ठेवण्यात आले होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शॉर्टसíकटमुळे गोदामाला आग लागली. कापडाने पेट घेतल्याने काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने कारखान्यातील कर्मचार्यासह परिसरातील नागरिकांना आग लागल्याचे समजले. तात्काळ अग्निशामक दल व पोलिस कंट्रोल रुमला या घटनेची माहिती देण्यात आली.
इचलकरंजीसह जयसिंगपूर, कुरुंदवाड येथील नगरपालिका व चंदूर ग्रामपंचायतीचा बंब घटनास्थळी दाखल झाले. पाच तास पाण्याचा मारा करुन जवानांनी आग आटोक्यात आणली. या आगीत कापडाचे सुमारे १८०० तागे जळून खाक झाले. त्यामुळे सुमारे सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा समजते.
‘आधी वर्दी द्या, मग बघू’
या दुर्घटनेबाबत माहिती देण्यासाठी गोयल यांनी हातकणंगले पोलिस ठाण्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. त्यावर डय़ुटीवर असलेल्या ठाणे अंमलदाराने माहिती घेण्याऐवजी ‘तुम्ही वर्दी द्यायला पोलिस ठाण्यात या, नंतर बघू’ असे सांगितले. त्यामुळे आधी आग विझवण्यासाठी प्रयत्न करु की पोलिस ठाण्यात वर्दी द्यायला जाऊ अशी द्विधा मनस्थिती गोयल यांची झाली होती. त्यांनी पोलिसांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘आधी वर्दी द्यायला या’ या एकाच वाक्यावर पोलिसांची सुई अडकली होती.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2016 रोजी प्रकाशित
कापड गोदामाला हातकणंगलेत आग
सव्वा कोटी रुपयांचे नुकसान
Written by लोकसत्ता टीम

First published on: 02-01-2016 at 03:15 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire to cloth godown in hatkanangale