कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुण्याहून आलेला पहिला करोना रुग्ण आणि त्याच्या संसर्गात आल्याने बाधा झालेली त्याची बहीण अशा दोघांचेही दोन्ही करोना अहवाल निगेटीव्ह आल्याने ते करोना मुक्त झाले होते. या दोघांना शनिवारी येथील अथायू रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षांवात आणि तुळशीचे रोप देऊन घरी सोडण्यात आले.

येथील भक्तीपूजानगरमध्ये पुण्याहून आलेल्या तरूणाला  २६ मार्च रोजी करोना झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या बहिणीचाही करोना अहवाल पॉझीटिव्ह आला होता. या दोघांनाही सरनोबतवाडी येथील अथायू रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या ठिकाणी अथायू रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश पुराणिक, नर्सिंगच्या अधीक्षक शीतल राणे, उप व्यवस्थापक राहुल खोत, कॅज्युलिटी इनचार्ज विजय महापुरे हे या दोघांवर उपचार करत होते.

या २३ दिवसांत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे, काही पूरक जीवनसत्त्वे, जोडीला समुपदेशन आणि आयुर्वेदिक उपचार करण्यात आले. त्याचा रुग्णांना लाभ झाल्याची माहिती डॉ. पुराणिक यांनी दिली.  विलगीकरण कक्षमध्ये जीवनरक्षक यंत्रणेसह सर्व आपत्कालीन सुविधा तैनात ठेवण्यात आली होती.

घर परिसरात स्वागत

आज करोनामुक्त झालेले भाऊ बहीण भक्तीपूजानगर येथे राहत होते. त्यांना करोना झाल्यापासून परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. लोकांमध्ये भीती होती. मात्र आज दोघेही करोनामुक्त झाल्याने येथील रहिवाशी आनंदित झाले होते. त्यांनी टाळ्यांच्या गजरात भाऊ बहिणीचे आनंदाने स्वागत केले. चिंतेचे जाळे दूर होऊन आनंदमयी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होत्या.

आनंद, उत्साह

चौदा दिवसांनंतर या दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्याने ते करोनामुक्त झाले होते. आज विलगीकरण कक्षापासून दोन्ही बाजूला रांगोळ्या काढल्या होत्या, फुगे लावण्यात आले होते. रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात या दोघांना निरोप दिला. प्रवेशव्दारावर  फुगे फोडून त्यांच्यावर फुलांचा वर्षांव करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या दोघांनाही तुळशीचे रोप आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, रूग्णालयाचे अध्यक्ष अनंत सरनाईक उपस्थित होते.