व्याजाने घेतलेले पैसे परत करुनही पैशासाठी वृद्धेचे अपहरण करून तिला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या उपशहरप्रमुखासह पाच जणांना बुधवारी करवीर पोलिसांनी अटक केली. याबाबतची फिर्याद रविराज बाजीराव पाटील (वय ३७ रा. वडणगे ता. करवीर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाचही संशयितांची रवानगी ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत केली.
वीरकुमार श्रीपाल देवकुळे (वय ३८), शिवसेनेचा उपशहरप्रमुख विशाल श्रीपाल देवकुळे (वय ३६ रा. दोघेही टाकाळा कोल्हापूर), ओंकार अशोक सुरवसे (वय २२), सुरेश दिलीप कांबळे (वय २२), दीपक आप्पासो बेळुंके (वय २९ तिघेही रा. टेंबलाईनाका, रेल्वे फाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
रविराज पाटील यांचा गाडय़ा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. ते आपल्या कुटुंबासह वडणगे येथे राहतात. गाडी खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये नुकसान आल्याने रविराज यांनी २०१४ साली वीरकुमार देवकुळे याच्याकडून २ लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. एक महिना पूर्ण झाल्यानंतर रविराज यांनी १० टक्के व्याजाने २० हजार रुपये वीरकुमारला दिले होते. यानंतर आíथक अडचणीमुळे रविराज यांनी व्याजाचे पसे दिले नाहीत. यामुळे वीरकुमार याने रविराज यांच्याकडे मुद्दल व व्याजाच्या पशासाठी तगादा लावला. या तगाद्याला कंटाळून रविराज यांनी आपल्या आईच्या नावे वडणगे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या जागेचे मुदतबंद खरेदीपत्राद्वारे लिहून दिली.
ही मुदत संपल्यानंतर मुद्दल व व्याज असे मिळून तू ७ लाख रुपये दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी वीरकुमार रविराजला देत असे. रविराजने २ लाख व त्यावरील व्याज देण्याचे कबूल केले. मात्र तरीही रविराज यांच्या घरच्यांना धमकावणे सुरु ठेवले. ८ मार्च रोजी तुझ्या आईला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली हाती. यानंतर घाबरलेल्या रविराज पाटील यांनी करवीर पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी तत्काळ तपास करुन कल्पना पाटील यांची वीरकुमारच्या टाकाळा येथील ऑफीसमधून सोडवणूक केली.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2016 रोजी प्रकाशित
शिवसेना पदाधिका-यासह पाच जणांना अटक
कर्जाच्या पैशासाठी वृद्धेचे अपहरण, मारहाण
Written by लोकसत्ता टीम

First published on: 10-03-2016 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five arrested with the shiv sena officers