इचलकरंजी येथील लिंबू चौकात दंगलकाबू नियंत्रणाची प्रात्यक्षिके सुरू असताना अश्रुधूर नळकांडीचा स्फोट होऊन चौघे जण जखमी झाले. यापकी शिवपुत्र शिविलग निंबाळ (वय ३५, कुलकर्णी मळा) व रेहान फरीद नदाफ (वय ९) या दोघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली तर शहरात बॉम्बस्फोट झाल्याच्या चच्रेला ऊत आला होता. पण अश्रुधुराच्या नळकांडीचा स्फोट कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.
लिंबू चौक हा भाग अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. शिवाजीनगर पोलिसांनी सायंकाळी या भागात दंगलकाबू नियंत्रण मोहिमेचे प्रात्यक्षिक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा चौकात दाखल झाला. अचानकपणे मोठा ताफा हजर झाल्याने नागरिकांनीही गर्दी केली होती. पोलिसांनी दंगल काबू योजनेची प्रात्यक्षिके करताना अश्रुधुराची दोन नळकांडी फेकली. त्यानंतर या नळकांडीतून मोठय़ा प्रमाणात धूर एकत्र झाला आणि क्षणार्धात यापकी एका नळकांडीचा स्फोट झाला. या स्फोटात शिवपुत्र निंबाळ यांच्या उजव्या कानाला मोठी दुखापत झाली. तसेच खांद्यासह हातालाही इजा पोहोचली. तर रेहान नदाफ हाही जखमी झाला असून त्याला गंभीर इजा पोहोचली आहे.
या घटनेनंतर दंगलकाबू योजना गुंडाळून पोलीस अधिकाऱ्यांनी जखमींना आपल्या वाहनातून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाल्याने पोलीस अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली होती. तर क्षणार्धात दंगलकाबू योजना बंद करण्यात आली. या घटनेचे वृत्त क्षणार्धात शहरात वाऱ्यासारखे पसरले, मात्र नेमका कशाचा स्फोट झाला याची माहिती नसल्याने बॉम्बस्फोट झाल्याच्या चच्रेला उधाण आले होते. घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयाच्या आवाराचा जणू ताबा घेतल्याचे चित्र दिसत होते. पोलिसांनी गंभीर जखमींना थेट खासगी रुग्णालयात हलवून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2016 रोजी प्रकाशित
अश्रुधूर नळकांडीच्या स्फोटात चौघे जखमी
दंगलकाबू नियंत्रण मोहिमेचे प्रात्यक्षिक
Written by लोकसत्ता टीम

First published on: 19-01-2016 at 03:10 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four injured in tear gas explosion