करवीरनगरीचे जलसौंदर्य असलेल्या रंकाळा तलावाला गालबोट लावण्याचे काम प्रशासनाने इशारा देऊनही थांबत नसल्याने म्हशी धुऊन प्रदूषण केल्याप्रकरणी चौघा व्यक्तींवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

न्यायालय, विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार कोल्हापूर शहरामध्ये पंचगंगा नदी, राजाराम बंधारा, रंकाळा तलाव व इतर ठिकाणी म्हशी, गायी, अन्य जनावरे, कपडे, वाहने धुण्यास व कचरा टाकण्यास बंदी घातली आहे. त्यानुसार मनपाच्या आरोग्य विभागातर्फे येथे नेहमी पाहणी केली जाते. रंकाळ्यावरील तांबट कमानीजवळ अनिल सरनाईक, राहुल साठे, उत्तम व्हडगे, युवराज दात्तरे या चार व्यक्ती म्हशी धूत होते. मनपाचे आरोग्य निरीक्षक गजानन रामचंद्र हावळे यांनी म्हशी धुऊ नका, प्रदूषण होते, असे त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी दुरुत्तरे करीत अरेरावी केली. त्यामुळे हावळे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या चौघांविरुद्ध फिर्याद दिली.