ढोल ताशांचा गजर, पर्यावरणपूरक उत्सवाची बीजे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मांगल्याचे प्रतीक असलेल्या मंगलमूर्तीची दहा दिवसांच्या मंगलोत्सवास सोमवारी करवीर नगरीत पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत सुरुवात झाली. लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद, चतन्य  ओसंडून वाहात आहे. रोषणाईने शहरातील रस्त्यांवर चतन्यदायी वातावरण झाले होते. पर्यावरणपूरक, डॉल्बीमुक्त उत्सवाच्या खुणा स्पष्टपणे जाणवत आहेत. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका सुरु होत्या.

रविवारी पहाटेपासून घरगुती गणपतीसह सार्वजनिक मंडळांच्या गणेशाच्या आगमनाला सुरुवात झाली होती. मानाच्या व प्रमुख मंडळाच्या मिरवणुकीने बाप्पांचे आगमन झाले. श्री महालक्ष्मी भक्त मंडळ, छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ, दिलबहार तालीम मंडळ यांच्यासह पुलगल्ली तरुण मंडळ, सम्राट चौक यांच्या मिरवणुका अधिक लक्षवेधी ठरल्या. या मिरवणुकीमध्ये बँडपथकासह करवीर नाद ढोल पथकाचा समावेश होता. तसेच, करवीर गर्जना ढोल ताशा पथकामध्ये युवकांसह युवतींनीही प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. मिरवणुकीत बारामतीच्या प्रसिध्द जयमल्हार डिजिटल बँड पथकाचा समावेश असल्याने त्यांनी सादर केलेल्या गाण्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले.

श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या मानाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी ८ वाजून २१ मिनिटानी गरुड मंडपामध्ये महालक्ष्मी बँकेचे संचालक शिरीष कणेरकर व त्यांच्या पत्नींच्या हस्ते पूजन करुन झाली. कोल्हापुरातील छत्रपती घराण्यात पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणपती आणण्यात आला आहे.  मानकरी, भालदार, चौपदार यांनी छत्रपती घराण्याचा हा गणपती पालखीतून न्यू पॅलेसवर आणला.  छत्रपती शाहू महाराज, राणीसाहेब महाराज, खासदार छत्रपती संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती, संयोगिता राजे छत्रपती आणि यशराजराजे छत्रपती यांनी गणेशाची विधिवत पूजा-अर्चा करुन प्रतिष्ठापना केली.

सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरु होत्या. िबदू चौकापासून ते संभाजीनगपर्यंत ठिकठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. काही मंडळांचा अपवाद वगळता बहुतांश मंडळांनी प्रशासनाच्या डॉल्बीमुक्त उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.   कोल्हापुरातील मुस्लीम गणेश भक्त आरीफ पठाण हे दररोज रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. पण गणेश चतुर्थीच्या दिवशी ते आपला व्यवसाय बंद ठेवून गणेशाची आणि पर्यायाने गणेश भक्तांची सेवा करतात. गंगावेस रिक्षा स्टॅन्डवर सगळ्या गणेश भक्तांना मोफत रिक्षा पुरवतात. प्रत्येक गणेश भक्ताला तुळशीचे रोप देत पर्यावरण रक्षणाचा संदेश देखील देतात. िहदु, मुस्लीम, शीख, इसाई हम सब भाई भाई असा संदेश दिला. त्यांच्या या उपक्रमाला अनेक रिक्षाचालकांनी दाद दिली. इतर रिक्षा चालकांच्यावतीने गणेश भक्तांना मोफत रिक्षा सेवा देण्यात आली. सुभाष नगरातील विवेक आनंदराव सातपुते सलग तिसऱ्यावर्षी, जवाहरनगरातील गणेश त्रिमुखे दुसऱ्यावर्षी तर हनमंत विश्वास जाधव सलग चौथ्यावर्षी ही सेवा देत आहेत. जनसेवा रिक्षा संघटनेच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati miravnuk in kolhapur
First published on: 06-09-2016 at 01:32 IST