कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापुरातील ‘उत्तरदायित्व’ सभा हि ईर्षेसाठी होत नाही, तर जनतेला विकास कामांचे ‘उत्तरदायित्व’ देण्यासाठी आयोजित केली आहे, असे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी व्यक्त केले. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठिकठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. त्यातील सर्वात विक्रमी गर्दीची सभा कोल्हापुरात होईल, असा दावा करीत त्यांनी शक्तिप्रदर्शनचे संकेत दिले.
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजवर भरघोस निधी दिला आहे. आताही त्यांनी काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यांच्या माध्यमातून महालक्ष्मी मंदिर आराखडा, उच्च न्यायालयाचे खंडपीठ आदी महत्वाची कामे पूर्ण करून घ्यायचे आहे. त्यासाठी त्यांची सभा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी उत्कृष्ट नियोजन करावे. पावसाने ओढ दिली आहे. कदाचित पुढील आठवड्यात पावसाला सुरुवात झाली तरी त्याचा परिणाम सभेच्या उपस्थितीवर होऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
हेही वाचा >>>क्रिप्टो करन्सीमधून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून ३७ लाखाची फसवणूक
सध्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून ती दूर करण्यासाठी तसेच त्यांना चांगला संदेश जावा असा या सभेचा उद्देश आहे,असा उल्लेख करून मुश्रीफ म्हणाले, खासदार.शरद पवार यांची सभा मोठ्या मैदानावर होण्याची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. मात्र उपमुख्यमंत्रीची सभा गर्दीचा उच्चांक मोडेल अशी मत त्यांनी व्यक्त केले.