कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जयसिंग महाराज उद्यान येथे न उभारता तो पुतळा सिटी सर्व्हे नंबर १२५१ येथे उभारणेच कायदेशीर ठरेल, अशी मांडणी करणारी याचिका काही नागरिकांनी कोल्हापूर सर्किट बेंच येथे दाखल केली आहे. या याचिकेवर येत्या २२ तारखेला उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले.
आंबेडकरवादी कार्यकर्ते विश्वजित कांबळे, स्वाती ससाणे, सुरेश भाटिया, अमित वाघवेकर, आदम मुजावर, शांताराम कांबळे, निखिल केसारे याचिकाकर्ते असलेल्या या याचिकेमध्ये जयसिंगपूर नगर परिषद, कोल्हापूर पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कोल्हापूर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, तसेच महाराष्ट्र शासनाला प्रतिवादी करण्यात आल्याचे व पुतळ्याला नाही तर प्रस्तावित ठिकाणाला विरोध करण्यात आल्याचे ॲड. योगेश सावंत यांनी सांगितले.
आमदार यड्रावकर त्यांच्या राजकीय सोयीनुसार पुतळ्याचे भावनिक राजकारण करीत असल्याने वारंवार पुतळा उभारण्याचे स्थळ बदलतात. पुतळ्यासंदर्भातील २०२७ च्या शासननिर्णयाचे पालन न करता एकतर्फी निर्णय घेण्यात येत आहेत. लोकांच्या सहभागातून निर्णय घेण्याची प्रक्रिया डावलण्यात आलेली आहे. स्थानिकांची परवानगी घेतलेली नाही. जयसिंग महाराज उद्यान ही बाग सामान्य माणसांसाठीचे निवांत ठिकाण म्हणून विकसित करण्यावर लक्ष न देता उद्यान उद्ध्वस्त केले जात आहे. सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर पुतळा बांधता येत नाही. पुतळ्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन झालेले आहे आदी आक्षेप याचिकेत नमूद केलेले आहेत.
वंचित, दलित, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त अभ्यासिका, लायब्ररी, स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्यांसाठी संदर्भ ग्रंथालय व मार्गदर्शन केंद्र, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या कार्यावरील विचारशिल्पे आणि प्रेरणास्रोत म्हणून डॉ. आंबेडकर यांचा पुतळा अशा क्रमाने करण्यात आलेली अत्यंत सयुक्तिक मागणी राजकीय सोयीसाठी काही जणांनी केवळ पुतळ्यापुरती मर्यादित केली. ही प्रक्रिया अयोग्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे, असे याचिकाकर्त्यांचे वकील असीम सरोदे म्हणाले.
उद्यानाच्या जागेवर डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्यास मनाई करावी, तसेच अभ्यासिका आणि पुतळा सर्व्हे नंबर १२५२ या जागेतच उभारण्यात यावा आदी मुख्य मागण्या या याचिकेतून करण्यात आल्याची माहिती ॲड. श्रीया आवले व ॲड. सिद्धी दिवाण यांनी दिली. ॲड. सरोदे म्हणाले, की डॉ. आंबेडकर यांचे विचार महत्त्वाचे न मानता केवळ पुतळ्याला महत्त्व देणारे राजकारण या याचिकेमधून उघड होणार आहे.
‘पुतळ्याचा आगमन सोहळा’ असा इव्हेंट करणे, दिखाऊपणा करणे असे प्रकार अस्तित्वात आणणे म्हणजे स्वतःच्या बौद्धिक कर्तृत्वाने जगात प्रतिष्ठा मिळविणाऱ्या डॉ. आंबेडकर यांचा अपमान आहे. येत्या २८ तारखेला बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा या दिखाऊ व राजकीय नाटकीपणावर स्थगिती द्यावी, अशी मागणी कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर करण्यात येणार आहे.