कोल्हापूर : जिल्ह्यात पाऊस जोरदार आहे. पावसाची गती पाहता राधानगरी, कुंभी परिसरात शुक्रवारी सायंकाळी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला.
कोल्हापूर जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होते. गेले दोन दिवस हलका पाऊस पडत होता. आज पहाटेपासूनच पावसाला जोर चढला. कोल्हापूर शहरात दिवसभर पाऊस पडत राहिला. पाणलोट क्षेत्रात पावसाची गती वाढली आहे. काल सायंकाळी चार वाजता जिल्ह्यात नऊ बंधारे पाण्याखाली गेले होते. आज सायंकाळी ही संख्या बारा इतकी झाली आहे.
राधानगरी काठोकाठ
कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी ओळखले जाणारे राधानगरी धरण भरण्यास फक्त एक फूट कमी आहे. धरणाची पाणी पातळी ३४६ फूट इतकी असून, पाणीसाठा ८.२४ टीएमसी इतका असून, ते ९९ टक्के भरले आहे. शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी पहाटेपर्यंत धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होणार असल्याची शक्यता जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भोगावती नदीकडच्या तेरा गावांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जलसंपदा खात्याकडून करण्यात आले आहे
कुंभीकाठी सतर्कतेचा इशारा कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. ६५० क्युसेक विसर्ग कुंभी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.