कोल्हापूर : इचलकरंजीजवळील तरुणाचा गोवा येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. अवधूत संजय जाधव (वय २९) असे त्याचे नाव आहे. अवधूत हा कामानिमित्त गोवा येथे वास्तव्यास होता. रविवारी मध्यरात्री काम आटोपून आपल्या मोटारीमधून तो घरी परतत होता. मडगाव येथे समोरून येणाऱ्या वाहनाच्या तीव्र प्रकाशझोतामुळे डोळे दिपल्याने अवधूत याची गाडी रस्त्याकडेच्या झाडावर आदळली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

त्याला दक्षिण मडगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या पश्चात अडीच वर्षांचा लहान मुलगा, पत्नी, वडील व भाऊ असा परिवार आहे. अवधूत हा माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे स्वीय सहायक संजय जाधव यांचा मुलगा होता.