कोल्हापूर : भाषावार प्रांतरचना करताना बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिक गावे कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ दरवर्षीप्रमाणे आज एक नोव्हेंबरला सीमा भागात काळा दिन निमित्त काढण्यात आलेल्या फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. दिवाळीचा मुख्य सण असतानाही मराठी बांधव काळे कपडे परिधान करून मोठ्या संख्येने बेळगावच्या रस्त्यावर उतरले होते.

धर्मवीर संभाजी उद्यान येथून फेरीला सुरुवात झाली. बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या जात होत्या. मागण्यांचे फलक हाती घेण्यात आले होते. काळा दिनाबाबत शहर आणि परिसरात जागृतीचे काम महाराष्ट्र एकीकरण समितीने हाती घेतल्याने फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. शहराचा मध्यवर्ती भागात फिरल्यानंतर फेरीची सांगता मराठा मंदिर येथे झाली.

हेही वाचा : कोल्हापूर: पंचवार्षिक पगारवाढ लांबल्याने ऐन दिवाळीत साखर कामगारांची तोंडे कडू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरवर्षी काळा दिनाच्या सभेसाठी महाराष्ट्रातून प्रमुख नेत्यांना निमंत्रित केले जाते. विधानसभा निवडणूक असल्याने यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या स्थानिक नेत्यांनीच नेतृत्व केले. या सभेत मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके, अमर येल्लूरकर, अरविंद केसरकर, सरस्वती चौगुले आदींनी भाषण केले. महाराष्ट्र एकीकरण समिती प्राणपणाने लढा देत असताना महाराष्ट्राचे याकडे दुर्लक्ष होत आहे, हे दुर्दैव आहे, असे नमूद करून बेळगाव तालुका अध्यक्ष, माजी आमदार मनोहर किनेकर म्हणाले, तरीही आमचा सीमा संघर्ष थांबणार नाही. यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे नवीन सरकार आल्यानंतर मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले जाईल. मुंबई आणि दिल्ली येथे लढा सुरूच ठेवला जाईल. नवी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनात आवाज उठवला जाई, असे त्यांनी स्पष्ट केले. दिवाळीचा सण असतानाही युवक प्रचंड संख्येने या लढ्यात सहभागी होतात, हे चांगले लक्षण असल्याचा उल्लेख त्यांनी केला. दरम्यान, काळा दिनाच्या मिरवणुकीसाठी शासनाने परवानगी नाकारली होती. तरीही याचे आयोजन केल्याबद्दल बेळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.