कोल्हापूर : कोल्हापूरात फलक लावण्यावरून दोन गटांत वाद झाला. त्याचे पर्यवसान तुफान दगडफेक, जाळपोळ, गाड्यांची तोडफोड करण्याच्या हिंसक घटनेत झाले. या प्रकरणी दोन्ही समाजातील सुमारे ३५ संशयतांची नावे निष्पन्न झाली असून, सुमारे १०० जणांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार वर्मा यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी पोलिसांची कुमक दाखल झाली. त्यांनी काही वेळातच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आज दिवसभर कुठलाही अनुचित प्रकार घडला नसला तरी तणावाची स्थिती आहे. या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की कोल्हापुरात नव्याने झालेल्या ‘सर्किट बेंच’ लगत असलेल्या सिद्धार्थ नगर आणि राजेबागस्वार येथील दोन गटांत हा वाद झाला. या दोन्ही गटांमध्ये अनेक दिवसांपासून तेढ आहे.
येथे एका मंडळाचा वर्धापनदिन असल्याने त्यांच्याकडून फलक लावण्यात आले होते. तसेच या वेळी ‘ध्वनीक्षेपकाच्या भिंती’ उभ्या करून मोठ्या आवाजात गाणी लावली होती. या कार्यक्रमासाठी मोठे व्यासपीठही उभारले होते. या साऱ्याचा अडथळा होत असल्याची तक्रार दुसऱ्या गटाकडून करण्यात आली होती. यातून सुरुवातीला किरकोळ वाद झाला होता. हाच वाद शुक्रवारी रात्री उशिरा भडकला. यावेळी दोन समुदांयामध्ये हिंसक संघर्ष झाला.
या वेळी दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली. काही वाहनांची मोडतोड, जाळपोळही करण्यात आली. या दगडफेकीत अनेक लोक जखमी झाले. तसेच अनेक वाहनांचे नुकसान झाले. या घटनेनंतर प्रशासनाने परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला. आज सकाळपासून या भागात तणावाचे वातावरण होते. सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन्ही समाजाच्या प्रमुखांसमवेत सलोखा समितीची बैठक झाली. त्यामध्ये शांतता राखण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रकरणी दोन्ही समाजातील सुमारे ३५ संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, सुमारे १०० जणांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाजवळ गैरसमजुतीतून दोन गटांमध्ये हा वाद झाला. दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. – योगेश कुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर.