कोल्हापूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे पडसाद उमटत आहेत. कथित मद्य घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. केजरीवालांना अटक झाल्याने आप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यांनतर आज रविवारी ईडीची प्रतिकात्मक होळी करून सुडबुद्धीने सुरु असलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला.

“ईडी-ईडी लावा काडी”, अशा घोषणा देत होळी पेटवण्यात आली. ईडीच्या नावाने शिमगा करत अनोखे आंदोलन करण्यात आल्याचे आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांना अटक केली आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यामातून भाजपने केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी केलेले हे षडयंत्र असून यासाठी ईडीचा गैरवापर केला जात असल्याचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : शक्तिपीठ महामार्गाविषयी कोल्हापुरात मंगळवारी जनसुनावणी; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर दखल

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, अतुल दिघे, आप उपाध्यक्ष सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, अमरसिंह दळवी, डॉ. कुमाजी पाटील, स्मिता चौगुले, मयुर भोसले, डॉ. उषा पाटील, उमेश वडर, शशांक लोखंडे, आनंदा चौगुले, राजेश खांडके, इस्थेर कांबळे, स्वप्नील काळे, विवेक भालेराव, राकेश गायकवाड, सफवान काझी, सचिन पाटील आदी उपस्थित होते.