कोल्हापूर : संततधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीने पहाटे ३९ फूट ही इशारा पातळी घातली आहे. दरम्यान आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. राधानगरी धरणाच्या पाण्याचा विसर्ग होत आहे. जिल्ह्यातील ८५ बंधारे पाण्याखाली आहत. ग्रामीण भागातील ४० हून अधिक मार्ग बंद आहेत.

शाहूकालीन राधानगरी धरणा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून धरणाच्या एकूण स्वयंचलित ७ दरवाजांपैकी ४ दरवाजे बंद झाले आहेत. सध्या ३ दरवाजे खुले आहेत. धरणाची एकूण ३ द्वारे (क्र. ३, ६ व ७) उघडली आहेत. एकूण ७५८४ क्युसेस इतका विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.

अलमट्टी धरणाचा विसर्ग आज २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजल्यापासून २ लाख क्यूसेस वरुन २ लाख ५० हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी ३९ फुटावर इशारा पातळी मानली जाते. पहाटे पाच वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ३९ फूट झाली असून बुधवारी पहाटेपासून इशारा पातळीवरुन नदीचे पाणी वाहत आहे. सकाळी १० वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी ४० फुटांवर आहे.

पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तीन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.  धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा विसर्ग मोठया प्रमाणात होत आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळी झपाटयाने वाढत आहे. पंचगंगा नदी बुधवारी पहाटेपासून इशारा पातळीवरुन वाहत आहे. राजाराम बंधारा येथे ३९ फुटावर इशारा पातळी मानली जाते. पहाटे पाच वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ३९ फूट झाली. पूरसदृश्य  स्थितीमुळे प्रशासनाने खबरदारीच्या सूचना केल्या आहेत.

बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर ओसरला आहे. रात्री तीन ते पहाटे पाच या वेळेत राधानगरी धरणाचे पाच स्वयंलचित दरवाजे बंद झाले आहेत. दोन दरवाजे खुले आहेत. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर थंडावला आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधारा येथे ३९.०९ फुटावर पोहचली.

राधानगरी धरणातून ४३५६ क्युसेक, दूधगंगा धरण २५००० क्युसेक,  वारणा धरणातून ३९६६३ क्युसेक तर  कोयना धरणातून ८२८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ८५ बंधारे पाण्याखाली आहत. ग्रामीण भागातील ४० हून अधिक मार्ग बंद आहेत.  यामध्ये आठ राज्य मार्ग, २२ प्रमुख जिल्हा मार्ग, दहा ग्रामीण मार्ग व एक इतर जिल्हा मार्गाचा समावेश आहे. त्या भागात पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

धामणी खोऱ्यातील म्हासुर्ली, गवशी, अंबर्डे, पनोरे गावांना बेटाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात ६८ घरांची पडझड झाली आहे. यामध्ये ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे आतापर्यंत दोन कोटी ४८ लाख रुपयांचा फटका बसला. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाटकडे जाणाऱ्या मार्गावरील संजयसिंह गायकवाड पुतळयासमोर पाणी आले आहे. यामुळे मंगळवारी सायंकाळी गंगावेश ते शिवाजी पुलापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.