कोल्हापूर : सर्वसामान्य लोक माझ्या पाठीशी असल्याने दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. राजू शेट्टी म्हणाले, नांदणी (ता. शिरोळ) येथील भुपाल माणगावे यांचा ९१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांचा मुलगा राजेंद्र माणगावे यांचा दोन दिवसांपुर्वी फोन आला व त्यांनी सांगितले की २८ तारखेला वडिलांचा ९१ वा वाढदिवस कुटूंबियांच्यावतीने साजरा करणार आहोत. आपण भेट घेऊन शुभेच्छा देऊन जावे. याप्रमाणे मी नांदणी येथील माणगावेकोडी मळ्यात शुभेच्छा देण्यासाठी गेलो.

हेही वाचा : कोल्हापूर : कागल तालुक्यातील व्हनाळी यात्रेत दोन गटांत मारहाण; अ‍ॅट्रोसिटीसह परस्परविरोधी गुन्हे दाखल

निवडणुकीसाठी ९१ हजारांची लोकवर्गणी

राजू शेट्टी म्हणाले, आई वडील दोघानांही शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त माणगावे कुटूंबीयाने लोकसभा निवडणुकीसाठी चक्क ९१ हजार रूपयांची लोक वर्गणी माझ्याकडे सुपुर्द केली. २००४ पासून हे कुटुंबीय सातत्याने चळवळीसोबत राहिले आहे. गत वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नातवाच्या लग्नातही त्यांनी ५१ हजार रूपयांची देणगी दिली होती. आज वडिलांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मुलगा राजेंद्र माणगावे यांनी ९१ हजार रूपयांची लोकसभा निवडणुकीसाठी लोकवर्गणी देऊन चळवळीस बळ देण्याचं काम केलं आहे. चळवळीवर प्रेम करणाऱ्या अशा लोकांमुळेच मी गेल्या ३० वर्षांपासून उजळ माथ्याने सांगत आलो की मी जन्माला आलो त्यावेळेस माझा हात स्वच्छ होता, ज्यावेळेस शेवटचा श्वास घेईन तेव्हा सुद्धा दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही, असा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.