कोल्हापूर : भारत आणि ब्रिटन यांच्यातील ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर (एफटीए) शिक्कामोर्तब झाल्यानंतर सर्वाधिक फायदा हा भारतीय वस्त्रोद्याोगाला होणार असून, ब्रिटनला होणारी निर्यात दुप्पट होण्याचा संकेत उद्याोजकांकडून मिळत आहे. विशेषत: कापूस व कापडनिर्मितीत अग्रस्थानी असलेल्या महाराष्ट्रातील वस्त्रोद्याोजकांना ब्रिटनमधील निर्यात वाढवण्याची संधी मिळणार असल्याची भावना या उद्याोजकांमधून व्यक्त होत आहे.

भारत आणि ब्रिटन यांच्यातील या दोन्ही देशांतील उद्याोग, व्यापार वाढीस लागावा यासाठी प्रयत्न सुरू होते. सुमारे तीन वर्षांच्या वाटाघाटींनंतर दोन्ही देशांतील ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर मान्यतेची मोहोर उमटली आहे. या कराराचा भारतातील कापड, अभियांत्रिकी वस्तू, वाहनांचे सुटे भाग, सागरी उत्पादने, चामडे, पादत्राणे, क्रीडा वस्तू, खेळणी, रत्ने, दागिने यांसारख्या कामगारकेंद्रित उद्याोगांना नवीन संधींचे दरवाजे उघडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारतातील वस्त्रोद्याोग निर्यातवाढीला या कराराचा चांगलाच लाभ होणार असल्याचे संकेत आहेत. कापड आणि वस्त्र प्रावरणे यांच्या जागतिक व्यापारात भारताचा वाटा ३.९ टक्के आहे. भारतातून अमेरिका, युरोपीय महासंघ, संयुक्त अरब महासंघाला प्रामुख्याने कापड आणि पोशाख निर्यात केले जातात. कापड आणि वस्त्र प्रावरणातील एकूण निर्यातीमध्ये हा वाटा ४७ टक्के आहे.

भारत सध्या ब्रिटनचा बारावा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. ब्रिटनला कपडे आणि घरगुती कापडाच्या निर्यातीमध्ये भारत पाचव्या स्थानावर आहे. २०२४ मध्ये भारताने ब्रिटनला १.४ अब्ज डॉलरची वस्त्रे आणि घरगुती कापडाची निर्यात केली होती. ब्रिटनच्या एकूण आयात कापडातील हा वाटा ६.६ टक्के आहे.

भारताला संधी

लिनन कापड उत्पादक यंत्रमागधारक, पीडीक्सेलचे (पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड प्रमोशन कौन्सिल) संचालक गजानन होगाडे यांनी सांगितले, की हा करार यंत्रमागधारक कापडउत्पादक, निर्यातदारांसाठी मोठ्या संधीचे पर्व आहे. भारतातून टी-शर्ट, महिलांचे व बाळांचे कपडे यांसारखे कापसावर आधारित कपडे ब्रिटनला निर्यात करण्याची संधी वाढणार आहे.

आशियाई स्पर्धा

भारताला ब्रिटनमध्ये कापड, तयार कपडे निर्यात करण्याची संधी वाढणार असली, तरी भारताला शेजारच्या आशियाई देशांशी स्पर्धा करावी लागणार आहे. भारतातून आयात होणाऱ्या वस्त्रावर आणि घरगुती कापडावर ब्रिटनकडून ८ ते १२ टक्के शुल्क आकारले जायचे. पण आता कापडासह ९९ टक्के भारतीय वस्तूंवरील आयातशुल्क ब्रिटनकडून रद्द करण्यात आल्यामुळे निर्यातीचे प्रमाण वाढणार आहे.

२०२४ मध्ये वस्त्रोद्याोग आणि घरगुती कापड ब्रिटनला चीनकडून सर्वाधिक म्हणजे २५ टक्के निर्यात करण्यात आले होते. पाठोपाठ बांगलादेश (२२ टक्के), तुर्की (८ टक्के) आणि पाकिस्तान (६.८ टक्के) यांचा क्रमांक आहे. त्यामुळे या देशांशी भारताला स्पर्धा करावी लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत आणि ब्रिटन सरकारने या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केल्याने दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि सेवा क्षेत्रात नव्या आणि आकर्षक संधी निर्माण होणार आहेत. या अनुकूल वातावरणामुळे महाराष्ट्रातील वस्त्रोद्याोग निर्यात लक्षणीय प्रमाणात वाढणार आहे. – ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर