शेतीमाल तारण योजनेत गुळाचा समावेश करणार असून, त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या मालकीच्या गोदामांचा साठवणुकीसाठी वापर करावा, असे प्रतिपादन सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केले.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाज आढावा मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील राजर्षी शाहू मार्केट यार्डच्या सभागृहात झाला. या वेळी ते बोलत होते.
कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. बऱ्याच वर्षांपासून गुळाचा समावेश शेतीमाल तारण योजनेत व्हावा अशी मागणी होती. शेतीमाल तारण योजनेत गुळाचा समावेश लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगून पाटील म्हणाले, की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाधिक सक्षम होण्यासाठी समितीने नवनवीन स्रोतांचा विचार करावा. फळे आणि भाजीपाला मार्केटमध्ये दररोज तयार होणारा कचरा आणि जनावरांच्या बाजारातील शेण यांचा वापर करून गांडूळ निर्मितीच्या प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करावा. बाजार समितीने सक्षमीकरणासाठी व शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, त्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल.
स्पध्रेच्या युगात टिकून राहायचे असेल तर बाजार समितीची प्रक्रिया युनिट, शीतगृहे, गोदामे, पॅकिंग हाऊस असले पाहिजे, असे सांगून सहकारमंत्री पाटील म्हणाले, की बाजार समितीचा परिसर स्वच्छ ठेवणे, पुरुष व महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, चांगले रस्ते या पायाभूत सुविधा बाजार समित्यांमध्ये असणे आवश्यक असल्याचे सांगितले. पणन मंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे यांनी कोल्हापूर विभागातील एकूण शेतकरी, या ठिकाणचे एकूण भौगोलिक क्षेत्रनिहाय उत्पादन व मार्केटमध्ये न येणारा माल याबाबत अभ्यास होण्याची आवश्यकता व्यक्त करून राज्य शासन व केंद्र शासन यांच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जास्तीतजास्त देण्यासाठी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2016 रोजी प्रकाशित
शेतीमाल तारण योजनेत गुळाचा समावेश करणार
कृषी उत्पन्न बाजार समिती
Written by लोकसत्ता टीम

First published on: 19-01-2016 at 03:00 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaggery will include in agricultural produce security scheme