या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या स्वाती कोरी नगराध्यक्षपदी विजयी; पालिकेत सत्ता मिळवत मातब्बर विरोधकांवर मात

‘जनता दल’ नावाचा पक्षाचे अस्तित्व सध्या महाराष्ट्रात फारसे कुठेही नसताना कोल्हापूर जिल्ह्य़ातील एका पालिकेवरच या पक्षाने सत्ता स्थापन केल्याने सध्या हा पक्ष चर्चेत आला आहे. जनता दलाचे माजी प्रदेश अध्यक्ष, माजी आमदार श्रीपतराव िशदे यांची कन्या स्वाती कोरी यांनी या पालिकेचे नगराध्यक्षपद मिळवतानाच पालिकेतील सत्ताही काबीज केली आहे.

राज्यात एके काळी पूर्वीच्या जनता पक्ष आणि आताच्या जनता दलाचे राजकीय पटलावर  वजन होते. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे आदींनी या पक्षाची बीजे रोवली होती. मधू दंडवते, बापूसाहेब काळदाते यांनी या पक्षाचा केंद्रीय पातळीवरही दबदबा निर्माण केला. मृणालताई गोरे, संभाजीराव काकडे, संभाजी पवार यांनी पक्षाचे नाव सतत वाढवत ठेवण्याचा प्रयत्न केला. अलीकडच्या काळात श्रीपतराव िशदे, निहाल अहमद, शरद पाटील, प्रताप होगाडे,  डॉ. पांडुरंग ढोले यांनी पक्ष नेतृत्वाची धुरा वाहिली. एके काळी दोन अंकात विधानसभेत सदस्य असलेल्या या पक्षाचे २००५ सालच्या निवडणुकीत शेवटचे २ शिलेदार विधानसभेत  निवडून गेले होते. दादा जाधवराव व गंगाराम ठक्करवाड यांनी केलेले प्रतिनिधित्व अखेरचे ठरले. यानंतर झालेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत जनता दलाला खातेही उघडता आले नाही. यावरून पक्षाची राजकीय ताकद लक्षात येते. या साऱ्या पाश्र्वभूमीवर गडहिंग्लजमध्ये या पक्षाने थेट पालिका काबीज केल्याने सगळय़ांच्याच नजरा विस्फारल्या गेल्या आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या कोल्हापूर जिल्’ाातील गडहिंग्लजमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या पक्षाचे चांगले अस्तित्व आहे. माजी आमदार श्रीपतराव िशदे यांनी इथे केलेल्या कार्यातून पक्ष आजही जिवंत आहे. सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून इथे मतदारांशी या घराण्याचा चांगला संपर्क आहे. यातूनच हा पक्ष इथे आजही अस्तित्व टिकवून आहे. या साऱ्या पाश्र्वभूमीवर यंदा पक्षाच्या वतीने गडहिंग्लज पालिकेमध्ये जोर लावण्यात आला आणि राष्ट्रवादी आणि भाजपच्या भांडणात या पक्षाने चक्क बाजी मारत पालिकेतील सत्ता मिळवली आहे. श्रीपतराव िशदे यांची कन्या स्वाती कोरी यांनी हे यश मिळवताना सत्ताधारी आमदार हसन मुश्रीफ आणि भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना पराभवाची धूळ चारली आहे. गडहिंग्लजमधील या विजयाने एका विस्मृतीत गेलेल्या पक्षाची पुन्हा सध्या चर्चा सुरू झाली आहे.

माजी आमदार श्रीपतराव िशदे यांनी इथे केलेल्या कार्यातून पक्ष आजही जिवंत आहे. सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून इथे मतदारांशी या घराण्याचा चांगला संपर्क आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janata dal win in kolhapur gadhinglaj
First published on: 30-11-2016 at 01:11 IST