कोल्हापूर : सत्तेत जाण्याची गडबड झाली असल्याने हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. कागल तालुक्यातील जनतेला हा निर्णय पटलेला नाही. निर्णय मान्य नसल्याचे ते निवडणुकीत दाखवून देतील. हसन मुश्रीफ प्रत्येक वरची पायरी चढतात. मात्र ती चढल्यानंतर आधीची पायरी छाटायचा प्रयत्न करतात, अशा जळजळीत शब्दात एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी मंगळवारी केली.
कागल व मुरगुड नगरपालिका निवडणुकीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू सहकार समूहाचे नेते समरजित घाटगे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर बोलताना संजय मंडलिक यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जहरी टीका केली. ते म्हणाले, हसन मुश्रीफ यांना वाटते की तहहयात आपल्याला आमदार म्हणून राहायचे आहे. त्यामुळे प्रत्येकाला जवळ घेऊन त्यांच्यासोबत युती करायची आणि नंतर वापरा आणि फेकून द्या ही नीती वापरायची त्यांची पद्धत आहे आहे. समरजीत घाटगे यांचं मत मला माहिती नाही.
दोघे एकत्र आल्याने भूकंप झाला असे म्हणणे चुकीचे आहे, असा उल्लेख करून मंडलिक म्हणाले, कागल मधील राजकीय भूकंप म्हणाल तर तो समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांसाठी आहे. आमच्यासाठी तो भूकंप नाही. आमच्या तालुक्यातील कोणताही गट असला तर तो कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतो. त्यांना सत्तेत येण्याची फारच गडबड झाली आहे.सत्तेच्या गडबडीमुळे ते जनता विसरले आहेत. नेत्यांसाठी आपण डोकी फोडून घेतो ते मात्र ऐनवेळी आपल्याला वाऱ्यावर टाकतात हे आता कार्यकर्त्यांना कळून चुकले असेल.
महायुतीचा घटक म्हणून आम्ही आणि मुश्रीफ यांच्यात नैसर्गिक युती होईल असे वाटले होते. मुरगुड मध्ये फोडाफोडीचे राजकारण झाल्यानंतर मधल्या काळात मी मुश्रीफ यांच्या संपर्कात नव्हतो. तर समरजीत घाटगे यांच्याशी युती करण्यात काहीही संबंध नव्हता.
स्थानिक पातळीवरती कार्यकर्ते एकमेकांशी चर्चा करत होते. मात्र या दोघांची चर्चा कधी झाली हे माहिती नाही. हे दोघे एकत्र आल्यामुळे मी काही तोंडघशी पडलेलो नाही. उलट ते आणि त्यांचे समर्थक तोंडघशी पडलेली आहेत, असे मंडलिक म्हणाले.
कागल तालुक्याचा इतिहास बघितला तर माझे वडील चार वेळा आमदार आणि चार वेळा खासदार होते. मी दोन वेळा खासदारकीला पराभूत झालो असलो तरी एक वेळा खासदार झालो. कागल तालुक्याने मला मोठं मताधिक्य दिले आहे. जनता माझ्यासोबत असल्यामुळे मला एकाकी पडल्या सारखे वाटत नाही. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत एक वर्षा नंतर सहकारातील निवडणुका असतील. त्याच त्यावेळी बघू. अजून पुलाखालून खूप पाणी जाणार आहे, असे म्हणत मंडलिक यांनी सबुरीचा पवित्रा घेतला.
सध्याची परिस्थिती बघितली तर मुश्रीफ व घाटगे यांनी एकत्रित येणे हे लोकांना आवडलेले नाही. निश्चितपणाने जनता माझ्या मागे उभा राहील. कागल नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासह सर्व जागांवरती शिंदे शिवसेनेचे उमेदवार उभे केले आहेत. मुरगुड नगरपालिकेत भाजप आणि शिंदे गटाची युती होत असल्याने तेथील जागावाटप होईल. मुरगुडला शिवसेनेचा नगराध्यक्ष निश्चितपणे होईल. कागलला परिस्थिती बदलत जाणार आहे. ती कशी बदलेल हे मी नंतर सांगेन. आजमीतिला कागलला देखील आमची सत्ता येऊ शकते. कागलला राजकीय विद्यापीठ म्हणतात ते यमुळेच. इथला मतदार सजग आहे..नेते इकडून तिकडं जातात म्हणून त्याला राजकीय विद्यापीठ म्हणत नाहीत. कागल तालुक्याची जनता काय करायचे हे पक्के ठरवते. याचा प्रत्यय या निवडणुकीत दिसेल, असा विश्वास संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.
हसन मुश्रीफ यांना याच आयुष्यात नाहीतर पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी आमदार, मंत्री व्हावे. पण हे करत असताना, मैत्री करताना केलेले उपकार त्यांनी जाणले पाहिजे. त्यांना ज्यांनी निर्माण केले त्या.सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांना त्यांनी विसरू नये.
हसन मुश्रीफ प्रत्येक वरची पायरी चढतात. मात्र ती चढल्यानंतर आधीची पायरी छाटायचा प्रयत्न करतात, अशा जळजळीत शब्दात मंडलिक यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली.
