कोल्हापूर : कागल येथील उरूसात जायंट व्हील पाळणा अचानक पडला बंद पडला. यामुळे काही काळ गोंधळ उडाला. यामध्ये सुमारे
१८ नागरिक तब्बल चार तास अडकून पडले होते. बचाव पथकाने शर्तीचे प्रयत्न करून त्यांना सुखरूपरीत्या खाली उतरवल्यानंतर उपस्थित लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. या घटनेमुळे तीन वर्षांपूर्वी पट्टण कोडोली (तालुका हातकणंगले) येथील विठ्ठल बिरदेव यात्रेत पाळणा तुटून एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाल्याची धक्कादायक घटनेची आठवण झाली.
कागल शहरातील श्री गहिनीनाथ गैबीपीर ऊरूसास सुरुवात झाली आहे. बापूसाहेब महाराज चौकात उभारलेल्या एका जायंट व्हील पाळण्यामध्ये रात्री अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पाळणा बंद पडला. त्यात बसलेले १८ नागरिक तब्बल चार तास अडकून राहिले.
पाळणा क्षमतेच्या वर गेल्यावर अडकला. ही अडक काढण्याचे पाळणा मालकाकडून प्रयत्न सुरू होते. तो निघाला पण अडीच ते तीन फूट खाली येऊन दुसऱ्या अडक मध्ये तो पुन्हा अडकला. यावेळी बसलेल्या माणसांचा झोला पाळण्याला सहन होईल की नाही ही शंका मालकांना आली. त्यातून त्यांनी दुसरा काय बचाव मार्ग करता येईल काय याची चर्चा सुरू केली.
यावेळी आनंद हेगडे यांनी पालिकेचे कर्मचारी बाळासाहेब माळी यांना फोन करून सदरची कल्पना दिली. माळी यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे प्रमुख मनीष रणभिसे यांना संपर्क साधून मदतीचे आवाहन केले. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांना या घटनेची कल्पना दिली.
मनीष रणभिसे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची विशेष परवानगी घेऊन सुमारे दीडशे फूट लांब जाणारी टर्न टेबल लँडर ही कोल्हापूर अग्निशमन दलाची क्रेन तातडीने कागलकडे पाठवून दिली. परिस्थितीचा अंदाज घेऊन कोल्हापूर मनपा अग्निशमन दल व बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून पाळण्यात अडकलेले सर्व नागरिक सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
तांत्रिक बिघाडामुळे पाळणा बंद पडल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर भाविक व उपस्थित नागरिकांनी दिलासा व्यक्त केला. वेळेवर पोलिस आणि अग्निशमन दलाने दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत राहिली. पाळणा चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पालिका प्रशासनाकडे याची परवानगी घेतली होती का याचीही चौकशी सुरू आहे .
या पाळण्यात महादेव लक्ष्मण पाटील (गोकुळ शिरगाव ), श्रेयस अमर धनवडे ( कणेरी मठ ), अर्चना महादेव पाटील (गोकुळ शिरगाव ), प्रणव संजय साऊळ ( कागल ), आवलीश माळी ( पुणे ), अमर धनवडे ( कणेरी ), समन्यू गिरीष ठोंबरे ( कागल ), पूनम संतराम बांबुगडे ( कागल ), निहिरा सचिन कारळे ( कागल ), शिवानी श्रीकांत सूर्यवंशी (कागल ), हर्षद शिवाजी साऊळ ( कागल ), शुभांगी अमर धनवडे ( कणेरी मठ ), अभिषेक मिलिंद शहा ( कागल ), ओमकार पांडूरंग सुतार ( कागल ) , साहिल शब्बीर माणगावकर ( निपाणी ), पृथ्वीराज महादेव पाटील ( गोकुळ शिरगांव ), साहिल रफिक ( उत्तर प्रदेश ) , काशिनाथ अत्तार ( निपाणी) आदींचा समावेश होता . श्रेयस अमर धनवडे, महादेव लक्ष्मण पाटील, अर्चना महादेव पाटील या तिघांना सर्वात प्रथम क्रेनच्या सहाय्याने काटकर यांच्या इमारतीवर उतरवण्यात आले . यावेळी हे तिघेही भेदरलेल्या अवस्थेत होते .
सुटका झाल्यानंतर बोलताना महादेव पाटील यांनी सांगितले की, आम्ही कुटुंबातील सहा जण आम्ही वर अडकलो होतो. पाळणा बंद पडल्याने भीती वाटत होती. सुखरूप बाहेर आलो आहे. स्वर्गातून परत आल्यासारखे वाटू लागले. आम्हाला मुक्त करण्यात सहकार्य केले त्यांचे आभार. आता पुन्हा पाळण्यात बसू नये असे वाटत आहे . तर आपला अनुभव कथन करताना निहिरा सचिन कारळे यांनी सांगितले की, इतक्या मोठ्या संकटातून मला वाचवले त्यामुळे सर्वांची आभारी आहे .
कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलातील मुख्य अधिकारी जयवंत खोत यांनी बचाव कार्याविषयी बोलताना सांगितले की, कागलमध्ये मनोरंजनाच्या पाळण्यात १८ लोक अडकले असल्याचा संदेश आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी दाखल झाली. तत्परतेने मदत कार्य सुरू करून अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढले .
अग्निशमन दलाचे चालक ओंकार खेडकर, ऑपरेटर अमोल शिंदे, फायरमन प्रमोद मोरे, फायरमन अभय कोळी , कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावटे, त्यांचे पथक, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, सौरभ पाटील, अमित पिष्टे , महावितरण तसेच कागल नगरपालिका विद्युत विभागाचे कर्मचारी , नगरपालिकेचे राजू खांडेकर, राज्य विद्यूत मंडळाचे गणेश परीट रोहित ठेंगे, साईप्रसाद कुरतूडकर, फिरोज तांबोळी, सोहम काटकर यांचा बचाव कार्यात समावेश होता.
