कोल्हापूर : येथील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह काल रात्री लागलेल्या आगीत भस्मसात झाले. कोल्हापूरकरांच्या तोंडी असलेले ‘केभो ‘ नाट्यगृह भस्मसात झाल्याने कला प्रेमींमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. काल मुंबई येथे असलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ आज सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी तातडीने केशवराव भोसले नाट्यगृहाकडे धाव घेतली. तेथील जळीतकांडाची त्यांनी माहिती घेतली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, या नाट्यगृहामध्ये अनेक मान्यवर कलाकारांच्या कलाकृतींचा आस्वाद घेतला आहे. आमचे अनेक राजकीय, सामाजिक कार्यक्रम याच मंचावर झाले आहेत. याला आग लागल्याचे पाहून अतिव दुःख झाले आहे. काल मुंबईतून मी याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. आता नाट्यगृहाची अवस्था पाहताना डोळ्यात अश्रू येत आहेत. हे नाट्यगृह पुढील काही काळ बंद ठेवावे लागेल. कोल्हापूरची नाट्य- कला संस्कृती वाढण्यात या नाट्यगृहाचा मोठा हातभार आहे. त्याची पुनर्उभारणी करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी, राज्य शासन, महापालिका यांची आहे.

हेही वाचा – Keshavrao Bhosale Theater Fire : केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीमुळे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची प्रशासनाला भीती

हेही वाचा – केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्यातील नामांकित रंगकर्मींची तयारी; अनेकांच्या मदतीचे हात पुढे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत. त्यांनाही येथे आणले जाईल. त्यांच्या माध्यमातून केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीसाठी प्रयत्न केले जातील. आधीपेक्षाही अधिक भव्य, आकर्षक असे नाट्यगृह बांधताना वारसाहक्क स्थळाची जपणूक केली जाईल, असे मुश्रीफ म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर प्रमुख, स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास, पदाधिकारी उपस्थित होते.