प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ येथे बुधवारी साधेपणाने आषाढी एकादशी पार पडली. कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ येथे पालखी दिंडी वाहनातून दहा वारकरी समवेत रवाना झाली. टाळेबंदीमुळे गावात कोणीही येऊ नये यासाठी तिन्ही बाजूचे रस्ते बंद करण्यात आले होते.

नंदवाळ येथे विठ्ठल मंदिरात पहाटे निवडक मान्यवरांच्या हस्ते पूजा विधी करण्यात आला. कोल्हापूरहून दिंडी आल्यानंतर स्वागत करण्यात आले. यावेळी मंदिर काही काळ उघडले. त्यानंतर पुन्हा मंदिर बंद करण्यात आले. यामुळे भाविकांना दर्शन घेता आले नाही. टाळेबंदीमुळे भाविकांनीही घरातूनच विठुरायाचे दर्शन घेणे पसंत केले.

कोल्हापुरात विठू नामाचा गजर

कोल्हापूरमधून सलग १७ वर्षे श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी नंदवाळकडे जाते. हजारो वारकरी यांचा सहभाग असलेल्या या दिंडीत करोनाच्या संकटामुळे खंड पडू नये यासाठी विशेष परवानगी देण्यात आली होती. भक्तीभावमय वातावरणात आणि पोलीस बंदोबस्तात निवडक वारकऱ्यांसह सजवलेल्या ट्रकमधून दिंडी विठू नामाच्या जयघोषात रवाना झाली. तत्पूर्वी, भक्त मंडळ व जय शिवराय फुटबॉल तरुण मंडळाच्यावतीने मिरजकर तिकटी येथे आरती झाली. वाहनातील वारकऱ्यांनी यावेळी आपल्या तोंडाला मास्क लावले होते. गतवर्षी तीनशे गावच्या दिंड्यांनी या वारीत सहभाग घेतला होता. मात्र, आज हे गजबजलेले चित्र पाहायला मिळाले नाही.