कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने डीबेंचर स्वरूपात कपात केलेली ४० टक्के रक्कम प्राथमिक दूध संस्थांना परत करावी, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्था प्रतिनिधींनी गोकुळ समोर उपोषण केले. मागण्यांची दखल न घेतल्यास दिवाळीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) प्राथमिक दूध संस्थांना डीबेंचर स्वरूपात याही वर्षी भरघोस रक्कम देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, ही घोषणा फसवी असून, या रकमेमध्ये गतवर्षी पेक्षा ४० टक्के रक्कम कपात केली असल्याचा आरोप दूध संस्थांकडून केला जात आहे. याबाबत चार दिवसांपूर्वी विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्यासह संस्था प्रतिनिधींनी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांना घेराव घालून विचारणा केली होती. तर आज याच मागणीसाठी गोकुळ जिल्हा दूध उत्पादक संस्था प्रतिनिधींच्या वतीने गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयासमोर उपोषण केले.
यामध्ये कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जोतीराम घोडके, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे, चंद्रशेखर मस्के, बाबासाहेब गोसावी, पांडुरंग मगदूम, अनिल कुरणे, अनिल जाधव यांच्यासह संस्था प्रतिनिधी सहभागी झाले होते.
यावेळी गोकुळने पशुखाद्य दरवाढ मागे घ्यावी, गाय दुधात प्रति लिटर सात रुपये प्रमाणे केलेली कपात मागे घ्यावी, शासनाकडून मिळालेले ४१ कोटी रुपये अनुदानातील अडचणी दूर कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या.