कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील शिवसेनेंतर्गत नेत्यांमधील मतभेद दूर करावेत, अशी आग्रही मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी करीत संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांना घरचा आहेर दिला. त्यावर दुधवडकर यांनी याबाबत योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असे स्पष्टीकरण केले.
कोल्हापूर शहरातील शिवसेनेतील गटबाजी नेहमी चर्चेत असते. शिवसेना एकसंघ असताना आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यातील वाद जिल्ह्यात चर्चेचे कारण ठरला होता. आता वाटा वेगळ्या झाल्या असल्या, तरी ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद कायम आहेत. त्याचा सामान्य शिवसैनिकांना त्रास होत आहे.
हीच बाब ठाकरे सेनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत शिवसैनिकांनी उपस्थित केली. शिवसैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. बैठकीला माजी नगरसेवक, पदाधिकारी अनुपस्थित असल्याबाबत शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांना जाब विचारला. इचलकरंजी महापालिकेमध्येही निष्क्रिय कामकाजावरून तेथील प्रमुखांना जाब विचारला गेला. बूथप्रमुख, नगरसेवक याची माहिती संबंधितांना देता आली नाही.
या प्रकारानंतर दुधवडकर यांनी पक्षांतर्गत मतभेद तातडीने मिटवावेत. आपल्याला महापालिका, जिल्हा परिषद जिंकायची आहे, असा संदेश दिला. उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, वैभव उगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.