कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला ४२ हजार २०० कोटींच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे उद्दिष्ट देण्यात आले. खरीप हंगामासाठी पीक कर्जाची जुलै अखेर १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक येथे पार पडली. त्यांच्या हस्ते अग्रणी बँकेच्या वार्षिक पतपुरवठा आराखडा पुस्तिका व आरसेटीच्या वार्षिक कृती आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये प्रत्येक गावामध्ये किमान एक लाभार्थ्याला लाभ द्यावा तसेच शासकीय योजनांतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणे वेळेत मार्गी लावा, अशा सूचना महामंडळ व बँकांना येडगे यांनी दिल्या.
कृषी क्षेत्रासाठी ७ हजार ३०० कोटी रुपयांचे तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगासाठी १२ हजार ५०० कोटी रुपये तर पीक कर्जासाठी ३ हजार ९०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले असल्याचे सांगून जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक मंगेश पवार यांनी मागील वार्षिक पतपुरवठ्याचे उद्दिष्ट व शासन पुरस्कृत योजनांचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले