कोल्हापूर : कोल्हापूर शहरात महापालिकेच्या वतीने फायर स्टेशनच्या इमारतीच्या स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना रात्री तो कोसळला. या घटनेमध्ये एक व्यक्ती ठार झाली असून अन्य पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमध्ये नवनाथ आण्णाप्पा कागलकर (वय ३८ रा शाहूनगर वडवाडी) यांचा मृत्यू झाला आहे. तर,
अक्षय पिराजी लाड (वय ३० रा शिवशक्ती कॉलनी गंगाई लॉन) , दत्तात्रय सुभाष शेंबडे ( ३७) , जया सुभाष शेंबडे (५६ रा संभाजीनगर) , वनिता बापू गायकवाड (वव४९ रा संभाजी नगर), सुमन सदा वाघमारे (वव ६० रा संभाजीनगर) हे पाच जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येते.
फुलेवाडी येथे भागांमध्ये कोल्हापूर महापालिकेच्या फायर स्टेशनचे काम सुरू होते. रात्री स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. याचवेळी तो कोसळला. त्यामध्ये काम करणारे अनेक मजूर गाडले गेले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. गाडले गेलेल्या लोकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अग्निशमन दल, आपत्ती निवारणाचे जवानांनी स्लॅब मध्ये अडकलेल्या बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये जखमी झालेल्यांना शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. घटनास्थळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.