कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी महायुतीचा अध्यक्ष निवडल्यानंतर झालेल्या पहिल्याच वार्षिक सर्वसाधारण सभेत आज महायुतीमधीलच विसंवाद उघड झाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या आरोप-प्रत्यारोपांचा गोंधळात महायुतीच्या अध्यक्षांकडून सहकारी पक्षाच्या संचालिकेच्या प्रश्नांनाही बगल देण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सभा आज पार पडली. मात्र या सभेसाठी दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्योरापांतून गेल्या काही दिवसांपासून वातावरण गाजत होते. काल विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सभासदांच्या हितासाठी विरोधात राहून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार असल्याच्या इरादा व्यक्त केला होता. त्यानुसार त्या सभास्थळी आल्या. त्यांच्यासमवेत काही संस्थांचे सभासद सुद्धा होते. त्यांनी सुरुवातीपासूनच आमच्या प्रश्नांचे उत्तरे द्यावीत या मागणीचा रेटा लावून धरला. परंतु विरोधकांना प्रश्न विचारण्याची संधीच द्यायची नाही अशा पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी एकूणच नियोजन केले होते. कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.
त्यानंतर अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी वर्षभरातील संघाच्या कामगिरीचा आढावा घेणारे लिखित भाषण तासभर वाचून दाखवले. पाठोपाठ सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मुळात ४२ प्रश्न आल्याचे जाहीर केले असले तरी एकंदरीत ५५ प्रश्नांची कंटाळवाणी सविस्तर उत्तरे देण्यास सुरुवात झाली. त्यातही गोकुळच्या कामगिरीचा डंका वाजेल अशा प्रश्नांची उत्तरे दिली. तर अडचणीच्या ठरणाऱ्या प्रश्नांसाठी कार्यालयात येऊन माहिती घ्यावी अशी सोयीची पद्धत कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी अवलंबली होती. विरोधकांची दमणूक करण्याची रणनीती सत्ताधाऱ्यांनी अवलंबली होती.
विरोधकांना सभेच्या शेवटी प्रश्न विचारण्याची संधी देण्यात येईल असे सांगून सत्ताधाऱ्यांनी मधल्या काळात वेळ मारून नेली होती. विरोधकांनी त्यावर विश्वास ठेवून सहकार्य केले. परंतु त्यांच्या प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरूपात कळवली आहेत असे सांगून अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी विरोधकांच्या प्रश्नांवर पडदा पाडून सभा गुंडाळली. गोकुळ दूध संघ सध्या २१ निर्वाचित संचालक आहेत. काही तालुक्याला प्रतिनिधित्व नाही. त्यामुळे २५ संचालक करण्याचा पोटनियम दुरुस्ती विषय सभेत मंजूर करण्यात आला.
विरोधकांकडून आरोप
त्यामुळे पुन्हा गदारोळ माजला. राष्ट्रगीत सुरू झाल्यामुळे विरोधकांना थांबावे लागले. त्यानंतरही शौमिका महाडिक व विरोधकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत सभेचे कामकाज आवरलेले होते. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा आवाज जाणीवपूर्वक दाबून आपल्या चुकीच्या कारभारावर पांघरूण घातल्याचा आरोप महाडिक यांनी केला.
आईस्क्रिम, चीज उत्पादन
आजच्या सभेत गोकुळच्या वतीने सुरू केल्या जाणाऱ्या नवी उत्पादनांचीही घोषणा करण्यात आली. यामध्ये संस्थेतर्फे लवकरच आईस्क्रिम व चीजचे उत्पादन सुरू केले जाणार आहे. याशिवाय नवी मुंबई येथे दही उत्पादन प्रकल्प राबवणे, ५०० वासरे तयार करणे, सीएनजी पंप व इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणी, ५०० रेडयांचे संगोपन करणारे केंद्र आदी घोषणाही या वेळी करण्यात आल्या.