कोल्हापूर : करवीर नगरीत उद्या, गुरुवारी शाही दसऱ्याचा कार्यक्रम ऐतिहासिक दसरा चौकात साजरा होणार आहे. त्याची आज जय्यत तयारी सुरू होती. तर यावर्षी केंद्र सरकारने वस्तू व सेवा करात (जीएसटी) लक्षणीय प्रमाणात कपात केल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याच्या अपेक्षा असल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने सुशोभित केली आहेत.

ऐतिहासिक परंपरेतील हा शाही कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने योग्य ती व्यवस्था केली आहे. या कार्यक्रमासाठी भाविकांची व नागरिकांची गर्दी होत असते. कार्यक्रम सुरळीत व सुरक्षित पार पडावा यासाठी तात्पुरती वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. दसरा चौक येथे दुपारी ३ नंतर गर्दी संपेपर्यंत सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे.

नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी यंदा नवमी आणि दशमीचा सोहळा होणार आहे. खंडेनवमीला नवरात्राची सांगता होते. नवमीला महालक्ष्मी मंदिर सकाळी ९ वाजता उघडण्यात येणार आहे. तोफेची सलामी दिली जाणार आहे.

कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव अंतर्गत उद्या सकाळी भवानी मंडप येथे ‘कोल्हापूरची शौर्यगाथा’ हा विशेष कार्यक्रम होणार असून ऐतिहासिक नगारखान्यास मंगलतोरण बांधण्यात येणार आहे. दुपारी भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर कोल्हापूरची परंपरागत शाही दसरा मिरवणूक निघणार आहे. तसेच न्यू पॅलेस ते दसरा चौक या मार्गावर शाही स्वारीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

अश्विन महिना सुरु झाला कि कोल्हापुरात चैतन्य पर्व सुरु होते. घटस्थापनेपासून महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातील भाविक येत असतात. दख्खनचा राजा जोतिबाचा नवरात्र उत्सवही तितकाच महत्त्वपूर्ण असतो. खंडेनवमीनंतर कोल्हापुरात तेज झळकू लागते ते शाही दसऱ्याचे. शाही दसऱ्याच्या मागोवा घेताना शिवशाहीपर्यंतचे दाखले मिळतात. मराठेशाहीच्या काळात कोल्हापुरातील दसरा दिमाखाने साजरा केला जाऊ लागला. तेव्हाचा थाटही वेगळाच होता. त्याचे वर्णन आजही मोठ्या कौतुकाने केले जाते.

करवीर संस्थानात आठवडाभर आधी तयारी सुरू असे. विजयादशमी दिनी दिवस मावळतीला झुकू लागल्यावर भवानी मंडपातून शाही मिरवणूक सुरू होत असे. बंदुकीतून बार उडवला की सनई, सुंदरी, डफडे या वाद्याच्या निनादात मिरवणूक पुढे सरकत असे. सजवलेला मोती हत्ती, त्यामागे अश्वदल, उंट, लष्करी वाद्यमेळा, पायदळ असा मिरवणुकीचा क्रम असे. पारंपारिक वाद्य आणि इंग्रजी चालीचा बँड याचा सुरेख मेळ लोकांना खिळवून ठेवत असे. अंबाबाई ,भवानी, देवी गुरु महाराज अशा तीन पालखी निघत. पालखी मागे छत्रपती महाराज, मानकरी, सरदार, इनामदार, जागीरदार, प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी, मल्ल असत. सायंकाळी सहा – साडेसहा वाजता ऐतिहासिक दसरा चौकात मिरवणूक पोहचे. सुशोभित शामियान्यात छत्रपती परिवार विराजमान होत असे. समोरच्या पटांगात आपटा रुपी सोन्याच्या पानांची रास उभारलेली असे. पुरोहित मंत्रोच्चार करीत शमीपूजन करीत. महाराजांना विडे दिल्यानंतर ते शमीपूजन करीत. पाठोपाठ सोने लुटण्यासाठी झुंबड उडत असे.