कोल्हापूर : जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. सामाजिक दायित्व निधी, शासन अनुदान, केंद्र व राज्य शासनाच्या योजना यांतून निधी उभारून क्रीडा विकासाला चालना द्यावी.
जिल्हाधिकारी, महानगरपालिकेच्या आयुक्त, क्रीडा विभाग, क्रीडा संघटनांनी समन्वय साधून जिल्ह्याचा ‘सर्वंकष क्रीडा विकास आराखडा’ तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी सविस्तर चर्चा करण्यासाठी क्रीडा प्रतिष्ठान सोबत पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सामाजिक दायित्व निधी मधून क्रीडा विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले.जिल्ह्यातील क्रीडा संघटनांनी ‘ क्रीडा प्रतिष्ठान कोल्हापूर’ संस्था स्थापन केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणात खेळाला महत्त्व दिले असून, संघटनांशी समन्वय साधून क्रीडा विकासासाठी प्रयत्न व्हावेत, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी केले.
जिल्ह्याचा क्रीडा विकास आराखडा तयार करण्यासाठी पुढील २५ वर्षांचा विचार करणे आवश्यक आहे. क्रीडा वसतिगृह, अद्ययावत सिंथेटिक ट्रॅक, जागतिक दर्जाचे फुटबॉल मैदान तयार करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी सांगितले.