कोल्हापूर : कोल्हापुरातील हेमकिरण रामचंद्र पणदूरकर यांनी २२ एप्रिलच्या पहलगाम भ्याड अतिरेकी हल्ल्या नंतर, निर्माण झालेल्या परिस्थितीत, भारतीय लष्कराचे मनोधैर्य व वित्तीय वाढ करून देण्यासाठी, “भारतीय राष्ट्रीय संरक्षण निधी, म्हणजेच नॅशनल डिफेन्स फंड” यासाठी पाच लाख रुपयांची देणगी पंतप्रधान कार्यालय, दिल्ली येथे रवाना करण्यासाठी डॉ. राम पणदुरकर यांच्याकडे धनादेश हस्तांतरित केला. सदर धनादेश पंतप्रधान कार्यालय दिल्ली या ठिकाणी रवाना झालेला आहे या निधीसाठी दिलेली रक्कम, अंडर सेक्रेटरी( फंड्स )पीएमओ, साऊथ ब्लॉक ,नवी दिल्ली येथे पाठविण्यात आली असल्याचे बुधवारी सांगण्यात आले.
यापूर्वी पणदूरकर यांनी शिवाजी विद्यापीठात कमवा व शिका योजनेअंतर्गत, गरीब मुलींच्या अभ्यासिकेची सोय करण्यासाठी रुपये ६० लाख ची देणगी दिली होती त्यातून त्यांची दिवंगत कन्या कैलासवासी, डॉक्टर, विद्धिज्ञ रूपाली पणदूरकर अभ्यासिका, बांधून त्याचे उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले .सदर अभ्यासिका ,दुमजली असून सुसज्ज बनविण्यात आलेली आहे. ३०० विद्यार्थीनीं, एकावेळेस अभ्यास करू शकतील, अशा प्रकारची सोय करून ग्रंथालयही सुसज्ज करण्यात आलेले आहे. वाय-फाय ची जोडणी ही करून देण्यात आलेली आहे . लाडक्या लेकीच्या आठवणींचे दुःखाश्रू एका डोळ्यात आणि तिच्या स्मृती चिरंजीव करणारी अभ्यासिका इमारत साकारल्याचे आनंदाश्रू दुसऱ्या डोळ्यात, अशी या आईबापाची अवस्था पाहून सारेच उपस्थित हेलावून गेले होते. कमवा व शिका वसतिगृहाच्या सुरक्षित परिसरातील या अभ्यासिकेमुळे विद्यार्थिनींची मोठी सोय झाली आहे. मुख्य विद्यार्थिनी वसतिगृह आणि ‘कमवा व शिका’ विद्यार्थिनी वसतिगृह जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यामुळे दोन्हीकडील विद्यार्थिनींना या अभ्यासिकेचा लाभ घेणे सोयीचे होईल.
त्यानंतर अडीच महिन्याच्या आतच पेहलगामच्या अतिरिकीनीं केलेल्या भ्याड हल्ल्यात, पर्यटक मारले गेले. आमच्या सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी रुपये पाच लाख देणगी, कै. विधिज्ञ, डॉक्टर, रूपाली पणदूरकर स्मृती प्रित्यर्थ देण्यात आलेली आहे. यापूर्वीही पणदूरकर दांपत्याने अनेक सामाजिक संस्थांना कन्येच्या स्मृती प्रित्यर्थ देणग्या देण्यात आलेल्या आहेत .शिवाय लहान मुलींसाठीही ,पोस्टातील सुकन्या समृद्धी योजनेतही खाते उघडून काही लहान मुलींसाठी दरवर्षी ठराविक पैसे भरले जातात. शिवाजी विद्यापीठाचे माजी भूगोल विभाग प्रमुख व ज्येष्ठ विधीज्ञ प्रा. डॉ. राम पणदुरकर व त्यांच्या पत्नी हेम किरण पणदूरकर यांचे समाजातून कौतुक होत असून त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.