कोल्हापूर : गेले अनेक दिवस ‘पंचमहाभूत लोकोत्सवा’मुळे चर्चेत आलेल्या कणेरी मठाच्या गोशाळेतील ५० गाईंचा शुक्रवारी मृत्यू झाला, तर ३० गाई गंभीर आजारी आहेत. अन्नातून विषबाधा झाल्याने गाई दगावल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेने मठाच्या गोशाळा आणि त्यांचा दर्जा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेचे वार्ताकन करणाऱ्या पत्रकाराला मठाच्या स्वयंसेवकांनी मारहाण केली.

कोल्हापूरपासून जवळच असलेल्या कणेरी मठात मोठी गोशाळा आहे. मठात ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ सुरू असतानाच गोशाळेतील गाईंचा मृत्यू झाला. शिळे अन्न खाऊ घातल्याने गाई दगावल्याचे सांगण्यात  येते. अत्यवस्थ असलेल्या गाईंवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक उपचार करीत आहे. गाईंना वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागही शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

दरम्यान, घटनेच्या वार्ताकनासाठी गेलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना मठाच्या स्वयंसेवकांनी मारहाण केली. या प्रकाराचा कोल्हापूर प्रेस क्लबसह पत्रकार संघटनांनी निषेध केला आहे.

‘दुर्दैवी अपघात’

कणेरी मठात घडलेली घटना हा एक दुर्दैवी अपघात आहे. कोणीतरी अज्ञानातून हे केले आहे. जाणीवपूर्वक असे कोणी करणार नाही. रस्त्यावरील गाई आणून त्यांचा सांभाळ आम्ही करतो. त्यामुळे या गोष्टीचे मोठे दु:ख आम्हाला आहे, अशी प्रतिक्रिया मठाधीश अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी व्यक्त केली.

मठाचा इतिहास

सिद्धगिरी क्षेत्र पुरातन, धार्मिक आणि अध्यात्मिक पीठ आहे. गावाच्या नावावरून त्याला कणेरी मठ असे म्हणतात. मठाच्या अधिपत्याखाली सुमारे २०० मठ असून ते महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात विखुरलेले आहेत. येथील प्रमुख निलगार हे िलगायत आहेत. सुमारे ३०० एकर जमीन मठाकडे आहे. श्री मुप्पिन काडसिद्धेश्वर स्वामी यांनी मठ पूर्वीप्रमाणे सर्व जातीधर्मासाठी खुला केला आहे. ४९ वे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडे सध्या मठाची सूत्रे आहेत. त्यांनी मठाची धार्मिक, वैद्यकीय, शैक्षणिक, कृषी, गोशाळा, पर्यटनदृष्टय़ा व्याप्ती वाढवली आहे.

‘पंचमहाभूत लोकोत्सवा’ला गालबोट

कणेरी मठात पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सध्या ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ सुरू आहे. महोत्सवास दररोज अनेक राजकीय नेत्यांबरोबरच हजारो नागरिक भेट देत आहेत. महोत्सवात विविध उपक्रमांच्या जोडीने जनावरांचे प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. मात्र, एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर गाई दगावल्याने महोत्सवाला गालबोट लागले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काडसिद्धेश्वर स्वामींना राजकीय वलय मठामध्ये साधुसंत, महंत यांच्याप्रमाणे विविध पक्षाच्या नेत्यांची ये-जा असते. तथापि, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि हिंदूत्ववादी संघटनांचा वावर अधिक असतो. त्यामुळेच अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असतील, असे म्हटले जाते. त्याचा त्यांनी इन्कार केला असला तरी चर्चा मात्र आहेच.