कोल्हापूर : डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुना मागील सुत्रधारास (मास्टरमाईंड) पकडा, अशी मागणी बुधवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर, यांनी शिवाजी पेठे मधील प्रभात फेरी (मॉर्निंग वॉक ) मध्ये केली. 

राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल चव्हाण यांनी  भूमिका स्पष्ट केली. पुणे सत्र न्यायालयाने शरद कळस्कर आणि सचिन अंदुरे या दोघांना दोषी ठरवून शिक्षा दिली. पण या खुनामागील मुख्य सूत्रधार पर्यंत पोलिस पोहचायला तयार नाहीत. तसेच खून खटल्यातील आरोपी वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांची न्यायालयाने सुटका केली असली तरी सीबीआयने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली  पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
 
कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी सांगितले की शिक्षा झालेल्या आरोपी कोल्हापूर मध्ये काही काळ वास्तव्यास होते. ही साधक मंडळी लॉज मध्ये राहत नाहीत, ते दुसऱ्या साधकाच्या घरीच राहतात. तेव्हा या खुनी साधकांना कोल्हापुरातल्या ज्या साधकांनी आश्रय दिला आणि मदत केली त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केलेली नाही. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे, अशी मागणी केली.

जिल्हा अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विलासराव पोवार यांनी  समाजद्रोही  ब्राह्मण्यवादी विचारांचा आढावा घेतला. वारकरी संतांचा छळ करणारे, संत तुकारामांना वैकुंठाला पोहोचवणारे, संत ज्ञानेश्वर- एकनाथ यांचा छळ करणारे सनातनी विचाराचे होते; त्यांनीच फुले शाहू आंबेडकरांना सुद्धा विरोध केलेला आहे. बहुजन समाजाला अज्ञानात अंधश्रद्धे मध्ये खितपत ठेवण्याचे ब्राह्मण्यवाद्यांचे षडयंत्र आपण ओळखले पाहिजे, असे ते म्हणाले.

२६-११ च्या हल्ल्यात ब्राह्मण्यवाद्यांनी हेमंत करकरे यांचा खून केला हे पुराव्यानिशी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी पुस्तक लिहून प्रसिद्ध केले आहे. यासंबंधी शंभर व्याख्याने घेणार असे जाहीर केल्यामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून झाला, असे प्रतिपादन विकास जाधव यांनी केले. 
 
खंडोबा तालमीचे अध्यक्ष अजित  हरुगले यांनी, खुन्याच्या सूत्रधाराला पकडा आणि आरोपीला मदत करणाऱ्या कोल्हापुरातील साधकावर कारवाई करा, अशी मागणी केली. आभार एडवोकेट अजित चव्हाण यांनी मानले. 

प्रभात फेरी मध्ये स्वप्नील मुळे, पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयंत मिठारी, शहराध्यक्ष राजेंद्र खद्रे, प्रहार संस्था शिवाजी पेठचे अध्यक्ष अमर जाधव, आम्ही मांसाहारीचे अध्यक्ष आनंदराव चौगुले, अनिसचे जिल्हाध्यक्ष प्रा विलास पोवार , खंडोबा तालीम माजी अध्यक्ष पंडित पवार, खंडोबा तालीम अध्यक्ष अजित हारूगले, पद्माराजे संवर्धन समिती अध्यक्ष नंदकुमार पाटील करवते , दत्तात्रय पांचाळ ,विकास जाधव, नांद्रेकर सर , सुरेश ज्ञानदेव पाटील ,मुकुंद मोरे   कोल्हापूर जिल्हा वाहन चालक ड्रायव्हर संघटना अध्यक्ष संभाजी पाटील, मीना चव्हाण, सुधा सरनाईक ( जिजाऊ ब्रिगेड) , शीला सरनाईक ,योगातज्ञ शोभा पाटील , छाया  पोवार, अक्काताई सरनाईक ,विकास जंगम आदी  कार्यकर्ते सहभागी झाले होते.