अंबामातेचा अखंड जयघोष, भाविकांची उदंड गर्दी, भक्तिमय वातावरणात गुरुवारी महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि त्र्यंबोली देवीच्या भेटीचा रम्य सोहळा विधिवत पार पडला. आश्विनी शुद्ध पंचमीनिमित्त ( ललितापंचमी) यात्रा आज उदंड उत्साहात झाली. या सोहळ्यानंतर परंपरेने कुमारिकेच्या हस्ते कोहळारुपी राक्षसाचा वध करुन कुष्मांड विधी करण्यात आला. छत्रपती युवराज मालोजीराजे व शहाजी राजे यांच्या हस्ते कुमारिकेचे आणि देवीचे पूजन करुन कुष्मांड विधी झाला. कोहळा फोडल्यानंतर कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

नवरात्रोत्सवाची पाचवी माळ ललितापंचमीची म्हणजेच टेंबलाईवाडी येथील त्र्यंबोली देवीच्या यात्रेची असते.परंपरेनुसार शाही लवाजम्यासह तोफेची सलामी दिल्यानंतर देवीची पालखी मंदिराच्या मुख्य दरवाजातून टेंबलाईवाडीकडे मार्गस्थ झाली. याबरोबरच आपल्या संपूर्ण ताफ्यासह फुलांनी सजविलेली तुळजाभवानीची पालखी भवानी मंडपातून बाहेर पडली. छत्रपती मालोजीराजे यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. गुरुमहाराज वाडा येथील गुरुमहाराजांची पालखीही  रवाना झाली होती. या पालखीत शिवाजी महाराजांची सोन्याची मूर्ती, तुळजाभवानीच्या चांदीच्या पादुका या पालखीत होत्या. खंदेकरी, चार हुजरे, एक चोपदार असा लवाजमाही या पालखीसोबत होता.

पूर्व दरवाज्यातून त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी मार्गस्थ झालेली पालखी दुपारी  त्र्यंबोली मंदिरात पोचली. आज त्र्यंबोली देवीची सिंहासनारुढ पूजा बांधण्यात आली. आपल्या

रुपाचे तेजस्वी दर्शन घडवणाऱ्या त्र्यंबोली देवी आणि महालक्ष्मीचा भेटीचा सोहळा अतिव उत्साहात पार पडला. यानंतर गुरव कन्या कुमारिकेच्या हस्ते कोहळा फोडण्याचा विधी झाला. या विधीनंतर श्री महालक्ष्मीची पालखी पुन्हा मंदिराकडे मार्गस्थ झाली.

पालखीभोवती कडे

पालखी मार्गात रेस्क्यू टीमने देवीच्या पालखीभोवती कडे केले होते. रस्त्यावर असणारी वाहनांची, भक्तांची गर्दी या गर्दीत पालखी धरलेल्या मानकऱ्यांना, पालखीसोबत असणाऱ्या मान्यवरांना धक्काबुक्की होऊ नये यासाठी हे कडे करण्यात आले होते.

पौराणिक संदर्भ

कोल्हासुराचा पुत्र कामाक्ष याचा वध देवी त्र्यंबोली हिने केला.  त्यानंतर झालेल्या विजयोत्सवासाठी महालक्ष्मी तिला बोलवायचे विसरून गेली. त्यामुळे रुसलेली  त्र्यंबोली शहराच्या पूर्वेकडे असलेल्या टेकडीवर जाऊन बसली. सखीचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाई स्वत: आपल्या लवाजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीवर गेली. तेथे कोहळ्याच्या रुपाने कोल्हासुराचा वध कसा केला, हे तिने त्र्यंबोली देवीला दाखविले. या धार्मिक आख्यायिकेच्या संदर्भाने दरवर्षी ललितापंचमीला त्र्यंबोली टेकडीवर कोहळा फोडण्याचा विधी होतो.