कोल्हापूर : ‘व्हॅलेंटाईन डे’ आणि शिरोळचे गुलाब ठरलेले नाते… पुणे-मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या देशांतर्गत शहरांसह परदेशातही शिरोळचा गुलाब जात असे. ३० लाख गुलाबांची निर्यात करणाऱ्या तालुक्यातून या वर्षी मात्र एकाही फुलाची निर्यात झालेली नाही. दिवसेंदिवस परवडेनाशा झालेल्या फुलांच्या शेतीमुळे उत्पादकांनी गुलाबाला सोडचिठ्ठी देत ऊस आणि अन्य पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे.
कृष्णा – पंचगंगा काठचा शिरोळ हा उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. दिवंगत आमदार डॉ. सा. रे. पाटील यांच्या प्रयत्नाने कोंडिग्रे गावातील फोंड्या माळावर हरितगृहातील पुष्प शेती बहरू लागली. ५ एकरापासून सुरू झालेला हा प्रवास १०० एकरापर्यंत विस्तारण्यासाठी पुढे त्यांचे पुत्र गणपतराव पाटील यांनी परिश्रम घेतले. येथे उत्पादित होणारी फुले निर्यात केली जात असत. ‘व्हॅलेंटाईन डे’ला जगभरात असलेली मागणी लक्षात घेऊन श्रीवर्धन बायोटेकसह शेजारच्या घोडावत उद्याोग समूहाने हरितगृहात गुलाबाची लागवड केली. यातूनच सुमारे ३० लाख फुले युरोप, ऑस्ट्रेलियासह अन्य देशांत पाठविली जात. याखेरीज मुंबई, कोलकत्ता, हैदराबाद, दिल्ली अशा महानगरांत १० लाख फुले विकली असत. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत वाढलेला उत्पादन खर्च आणि मिळणारा दर यामधील अंतर जवळपास नाहीसे झाल्याने गुलाब शेती परवडेनाशी झाली आहे. शेती तोट्याची होऊ लागल्याने या दोन्ही बड्या हरितगृहांतून गुलाबाची शेती जवळपास संपुष्टात आली आहे. श्रीवर्धनमध्ये केवळ अर्ध्या एकरामध्ये गुलाबाची शेती केली जाते. घोडावत अॅग्रोने गुलाब शेती काढून तेथे ऊस लावला आहे. अन्य छोट्या उत्पादकांनीही शेती बंद केल्यामुळे यंदा एकाही फुलाची निर्यात झालेली नाही. करोना काळापूर्वी गुलाब शेतीला सोन्याचे दिवस होते. आता वाढत्या खर्चामुळे ही शेती परवडेनाशी झाली आहे. नाशवंत माल आणि अशाश्वत दर यामुळे आपण १५० एकरांतील गुलाब काढून ऊस लागवड केल्याचे घोडावत अॅग्रो फार्मचे व्यवस्थापक सुधीर पाटील यांनी सांगितले.
यंदाच्या प्रेमाला आयात गुलाबांचा आधार
छत्रपती संभाजीनगर : ‘व्हॅलेन्टाईन डे’निमित्त प्रेमाची गुलाबी भावना व्यक्त करण्यासाठी प्रेमीयुगुलांनी गुलाबाची खरेदी केली असेल. मात्र बहुतांश गुलाब हा परराज्यातूनच बाजारपेठेत आलेला असेल. कारण समस्या व आव्हाने यामुळे राज्यात पॉलिहाऊसची शेती करणारे १५-२० टक्के उत्पादकच उरले आहेत.
मशागत, खत-औषध, मजुरी, पॅकिंग, वीज या बाबी खर्चिक झाल्या आहेत. तुलनेने उत्पन्न कमी मिळत आहे. शिवाय हा हंगामी व्यवसाय आहे. त्यामुळे गुलाब शेती कमी करून ऊस, केळी, आंबा याकडे अधिक लक्ष दिले आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.रमेश पाटील, श्रीवर्धन बायोटेक