कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील धरण, नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेली असून, कृष्णेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी पावसाची उघडीप सुरू होती. सुटी लोकांना घरातच घालवावी लागली. पाणलोट क्षेत्रातील पावसाचा वेग वाढल्याने राधानगरी धरण पूर्णतः भरले आहे. सर्वांत मोठ्या दूधगंगा धरणातील (काळम्मावाडी) आवक वाढल्याने विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होत आहे.
बुडणाऱ्यास वाचवले
बीडशेट ( ता. करवीर) गावातील ७० वर्षीय गणपती बाबू सावंत हे भोगावती नदीपात्रामध्ये हात-पाय धुण्यासाठी गेले असता पाय घसरून पडले होते. पात्रातील झाडाचा आधार घेऊन सुमारे एक तास अडकले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रीतम केसरकर, कृष्णात सोरटे आदी जवानांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले.
लोखंडी साकव खचला
राधानगरी तालुक्यातील जोरदार पावसामुळे सकाळी चौके येथील हरप नदीच्या पुच्छ कालव्यावरील लोखंडी साकव खचला. नदीतील मधला खांब झुकला असून, तो वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे मानबेट, राई व चौके या गावांचा संपर्क तुटला असून, वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. पावसाळा अजून दोन महिने असून, परिसरातील नागरिक चिंतेत आहेत. प्रशासनाने तत्काळ मार्ग काढून गैरसोय टाळावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.