दहीहंडी मंडळे बहिष्काराच्या मन:स्थितीत

वीस फुटांपेक्षा जास्त उंचीवर दहीहंडी बांधू नये, तसेच १८ वर्षांखालील गोविंदांच्या दहीहंडीतील सहभागावर बंदी घालावी, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्यानंतर  त्याचे स्वागत नागरिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांच्याकडून करवीरनगरीत झाले. तर, हा निर्णय दहीहंडीचे आयोजन करणाऱ्या संयोजकांच्या पचनी पडला नसल्याने ते या उत्सवाला रामराम ठोकण्याच्या मन:स्थितीत असल्याचे दिसले.

गोकुळ अष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या दहीहंडय़ांना बंधन घालावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून उमटू लागली आहे. आता न्यायालयाचा हा निर्णय कार्यकर्त्यांच्या भावनाच व्यक्त करणारा असल्याचा सूर व्यक्त होत आहे. सणाचा आनंद घेताना त्याला दहीहंडी सारख्या सणातून गालबोट लागत असेल तर ते वेदनादायक आहे, असे मत कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पी. एम. चौगुले यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, दहीहंडीप्रमाणे विदेशातही काही साहसी खेळ होतात, पण तिथे सुरक्षेचा बारीक विचार केला जातो. ही दक्षता आपल्याकडे घेतली जात नसल्याने दहीहंडीत उंचावरून कोसळून जखमी होण्याचे, मृत्यू पावण्याचे  प्रकार घडतात. लहान मुले आयुष्यभरासाठी दिव्यांग (अपंग) बनून त्यांचे जीवन अंधकारमय होते. न्यायालयाच्या निर्णयाने या प्रकारांना पायबंद बसेल.

पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड म्हणाले, दहीहंडी साजरी करताना सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. धोक्याकडे न पाहता खेळणारा खेळून जाईल, पसे मिळवणारा मिळवून जाईल, मते मिळवणारा ती मिळवेल पण यातून एक विकृती निर्माण होईल. या बाजारू प्रवृत्तीला बाजूला सारून शिस्तबद्ध खेळ झाला तर ते समाजहिताचे ठरेल.

महाडिक नाराज

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी, तीन लाखांचे बक्षीस असणारी दहीहंडी खासदार धनंजय महाडिक आयोजित करतात. या निर्णयाने एक संयोजक म्हणून ते नाराज झाले. ते म्हणाले, वीस फुटांवरील दहीहंडीत थरार नसल्याने त्याचे संयोजन कोण करेल, त्यात गोिवदा पथके कशाला सहभागी होतील, निरस दहीहंडी पाहायला येईल तरी कोण?  न्यायालयाचा निर्णय पाळावा लागणार असला तरी सर्व संयोजक एकत्रित येऊन त्याचा विचार करतील.