कोल्हापूर : संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित विदुषी मंगला भट्ट (वय ६३) यांचे हैदराबाद येथे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या पूर्वाश्रमीच्या मंगला कुलकर्णी यांनी देश-परदेशात कथक नृत्यप्रतिभेचा आविष्कार सादर केला.
कोल्हापूरसारख्या शहरातून नृत्यप्रतिभेच्या जोरावर त्यांनी कलेच्या नभांगणात उंच भरारी घेतली. प्रतिष्ठित दिल्ली कथक केंद्रामध्ये पंडित दुर्गालाल यांच्याकडून त्यांनी कथकचे धडे घेतले. पंडित बिरजू महाराज यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित राघवराज भट्ट हे त्यांचे पती होत.
हैदराबाद येथील त्यांच्या आकृती कथक केंद्रासोबतच वेळोवेळी परदेशात राहून कथकचे प्रशिक्षण दिले. केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कारासोबतच अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून आहेत.
कोल्हापूरशी ऋणानुबंध
मंगलाताईंनी जन्मभूमी कोल्हापूरशी ऋणानुबंध कायमपणे जपले. गेली काही वर्षे गार्गीदेवी निंबाळकर यांच्या माध्यमातून त्या कथकचे प्रशिक्षण देत होत्या. अलीकडेच त्यांच्या शिष्यवर्गाचा ‘आवर्तन’ हा कार्यक्रम येथे सादर झाला होता.