कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सिद्धार्थ नगर येथे एका मंडळाच्या वर्धापन दिवसाच्या वादावरून दोन समाजात दंगल उसळली. या दंगलीची सखोल चौकशी करावी, दंगलखोरांसोबतच त्यांच्या सूत्रधारांवरही, आयुष्यभराची अद्दल घडेल, अशी कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन गुरुवारी कोल्हापूर नेक्स्ट या संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांना देण्यात आले.
प्रशासनाने या दंगलीला कितीही दोन मंडळांमधील भांडण असे स्वरूप दिले तरी प्रत्यक्षात ही दोन समाजातील घटना होती. पोलिस दलाने तातडीने कारवाई करत दंगल तर आटोक्यात आणलीच आणि दंगल घडविणाऱ्या गुन्हेगारांचे अटक सत्र सुरू करून कोल्हापूरकरांना दिलासा दिला याबद्दल कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यकर्त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ज्या मंडळाचा वाढदिवस होता त्या मंडळाचे कार्यकर्ते गेल्या काही कालावधीपासून सातत्याने सिद्धार्थ नगर मधील नागरिकांना अडचण होईल, त्रास होईल अशी वर्तणूक करीत आहेत. त्यातून वारंवार किरकोळ खटके होत असत. दंगल घडली त्यादिवशी दुपारी पोलिसांनी कारवाई करून मंडळाने सिद्धार्थ नगर कमानीजवळ उभे केलेले, नागरिकांना अडथळा ठरत असलेले ध्वनी यंत्रणेचे साहित्य काढून टाकल्यानंतरही काही राजकीय नेते या ठिकाणी आले.
त्यानंतर हळूहळू त्या ठिकाणी एका समाजाचा जमाव जमा होत गेला आणि रात्री त्यांनी सिद्धार्थ नगर मध्ये घुसून खाजगी मालमत्तांना नुकसान पोहोचवले. काही लोकांना मारहाणही केली. त्याचे स्वाभाविक प्रत्युत्तर सिद्धार्थ नगर मधील नागरिकांनी दिले. त्यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.
यातीलच काही राजकीय नेते दुसऱ्या दिवशी शांतता बैठकामध्ये अग्रेसर दिसत होते. परंतु सिद्धार्थ नगर मधील नागरिकांनी जाहीर प्रकटन दिल्याप्रमाणे ही दंगल पूर्व आणि सुनियोजितच होती असे आमचे म्हणणे आहे. काही वेळात शेकडोंच्या संख्येने जमाव एकत्र जमणे हे पूर्व नियोजनाशिवाय शक्य नाही. त्यामुळे पोलिस खात्याने या दंगलीकडे केवळ एक गुन्हा म्हणून न पाहता कोल्हापूर शहरांमध्ये अशांतता पसरविण्याचे काम करणाऱ्या काही लोकांनी पुन्हा एकदा अशांतता पसरविण्याचा केलेला प्रयत्न असे म्हणून पहावे असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
यापूर्वीही किरकोळ कारणांवरून कोल्हापुरात दोन-तीन वेळेला दोन समाज आमने-सामने आले होते. प्रत्येक वेळी काही ठराविक लोकांची भूमिका संशयास्पद होते आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून यातील कर्ते-करविते राजकीय कार्यकर्ते शोधून काढावे. त्यांना कायमची अद्दल घडेल अशी कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली.या शिष्टमंडळात निमंत्रक चंद्रकांत चव्हाण, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, विजयसिंह खाडे पाटील, प्रदीप उलपे आणि ऋतुराज नढाळे यांचा समावेश होता.